गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय सत्ताधारी संचालकांकडून रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 02:42 PM2019-10-28T14:42:04+5:302019-10-28T15:03:41+5:30
गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती
कोल्हापूर : गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. गोकुळच्या सत्ताधारी संचालकांनी हा निर्णय घेतला असून त्याबद्दलची माहिती चेअरमन रवींद्र आपटे यांनी दिली. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) सर्वसाधारण सभा बुधवारी होणार आहे. त्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला.
'गोकुळ'च्या गतवर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेटच्या ठरावाला आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतराव पवार यांनी विरोध केला. सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने मोठा राडा झाला. याशिवाय चप्पलफेकही झाली. त्यामुळे अवघ्या तीन मिनिटात घाईगडबडीत सभा गुंडाळावी लागली होती. लोकसभेत राष्ट्रवादीला मल्टिस्टेटचा फटका बसला. दूध उत्पादक मल्टिस्टेटच्या विरोधात असतील तर मी त्यांच्यासमवेत अशी भूमिका अरुण डोंगळे यांनी घेतली. पण गोकुळचे नेते पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेराव महाडिक यांनी मल्टिस्टेटमुळे दूध संघ खासगी होणार नसून तो दूध उत्पादकांचा राहील, अशी भूमिका घेतली.
लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघात मल्टिस्टेटचा प्रश्न पुढे आला होता. आता निवडणूक संपल्यानंतर गोकुळची सभा होत आहे. या सभेत मल्टिस्टेटवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जाण्याची शक्यता होती. या सभेसाठी रणनिती ठरवण्यासाठी आज आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांची बैठकदेकील बोलावली होती.