खाण देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीचा
By admin | Published: May 3, 2015 01:03 AM2015-05-03T01:03:48+5:302015-05-03T01:03:48+5:30
चंद्रपूर येथील कोळसा खाण कर्नाटक सरकाला देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीचा असून, यासंदर्भात होणारी टीका निरर्थक आहे
नागपूर : चंद्रपूर येथील कोळसा खाण कर्नाटक सरकाला देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीचा असून, यासंदर्भात होणारी टीका निरर्थक आहे. या खाणीच्या बदल्यात छत्तीसगडमधील खाणीतून महाराष्ट्राला मुबलक कोळसा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.
चंद्रपूरची ‘कनार्टक एम्टा’ ही कोळसा खाण कर्नाटक सरकारला दिल्याबद्दल शिवसेनेने केंद्रीय कोळसा मंत्री पीयूष गोयल यांना धारेवर धरले आहे. यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, ती खाण कर्नाटक सरकारला देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीचा आहे. या खाणीतून दोन वर्षांपासून कर्नाटकतर्फे उत्खनन सुरू आहे. ही खाण महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती पण कायदेशीर अडचणीमुळे खाण देता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. ज्या नियमाचा आधार घेऊन ही खाण महाराष्ट्राला देण्याचे नाकारण्यात आले त्याच नियमांचा आधार घेत छत्तीसगडमधील गरईपाल्मा खाणीतून सर्व कोळसा महाराष्ट्राला मिळावा अशी मागणी केली. या खाणीवर निम्मा हक्क गुजरातचा होता. मात्र सरकारने आमची मागणी मान्य केली. त्यामुळे पुढील ४० वर्षे महाराष्ट्राला मुबलक कोळसा मिळणार आहे.