खुनाचा फैसला ३० वर्षांनंतरही अनिर्णित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2017 05:52 AM2017-04-03T05:52:33+5:302017-04-03T05:52:33+5:30
सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचूनही, हा खून नेमका कोणी केला? याचा फैसला देशाची न्यायव्यवस्था ३० वर्षांनंतरही करू शकलेली नाही.
अजित गोगटे,
मुंबई- घर क्र. ९८, गुरुवार पेठ, पुणे येथे राहाणाऱ्या रघुनाथ नावाच्या व्यक्तीच्या खुनाचा खटला पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचूनही, हा खून नेमका कोणी केला? याचा फैसला देशाची न्यायव्यवस्था ३० वर्षांनंतरही करू शकलेली नाही.
या खुनाबद्दल गणेश श्यामराव आणि अविनाश श्यामराव या रघुनाथच्या शेजारी राहाणाऱ्या दोन अंदेकर बंधुंना दोषी ठरवून, त्यांना जन्मठेप ठोठावण्यावरून सर्वोच्च न्यायालयात न्या. प्रफुल्ल चंद्र पंत आणि न्या. रोहिंग्टन फली नरिमन या दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद झाल्याने, आता हे प्रकरण सुनावणीसाठी तिसऱ्या न्यायाधीशांकडे जाणार आहे. खून झाला, तेव्हा वयाने विशीच्या आसपास असलेल्या या दोन्ही भावांनी आता पन्नाशी पार केली आहे व इतकी वर्षे जामिनावर असलेल्या या दोघांच्या डोक्यावर आणखी काही काळ अनिश्चिततेती टांगती तलवार कायम राहाणार आहे.
सार्वजनिक शौचालय आणि नळावरून रघुनाथ आणि अंदेकर या दोन शेजाऱ्यांच्या कुटुंबांमध्ये बराच काळ कलगीतुरा सुरू होता. त्यातूनच घरासमोर सुरू झालेल्या भांडणातून गाडीखाना चौकातील राजेश बोर्डिंग हाउसपर्यंत पाठलाग करून आणि तलवार, चाकू, गुप्ती व खुकरी अशा तीक्ष्ण हत्यारांनी नऊ वार करून, १४ आॅक्टोबर १९८६ रोजी भर दुपारी रघुनाथचा खून करण्यात आला होता.
रघुनाथची पत्नी शकुंतला हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण १५ आरोपींना अटक करून, त्यांच्यावर खुनाचा कटला दाखल केला. त्यात शकुंतला व रघुनाथची त्या वेळी २३ वर्षांची असलेली मुलगी रोहिणी या दोघींनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून साक्ष दिली होती. मारेकऱ्यांचा या दोघींनी पाठलाग केला होता. ज्याच्या रिक्षातून रोहिणीने जखमी रघुनाथला ससून इस्पितळात नेले, त्या सुरेश चव्हाण याची साक्षही महत्त्वाची होती.
पुण्याच्या सत्र न्यायालयाने ११ मे १९८९ रोजी या खटल्याचा निकाल दिला आणि सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. याविरुद्ध सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या अपिलाचा निकाल न्या. डी. जी. देशपांडे व न्या. एस. आर. साठे यांच्या खंडपीठाने तब्बल १८ वर्षांनी म्हणजे, २० फेब्रुवारी २००७ रोजी दिला. शामराव अंदेकर, गणेश आणि अविनाश ही त्यांची दोन मुले आणि विजय रामचंद्र यादव या चार आरोपींच्या बाबतीत उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल फिरविला व त्यांना संगनमताने खून केल्याबद्दल (भादंवि कलम ३०२ व ३४) त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
या चौघांनी याविरुद्ध केलेल्या अपिलाचा निकाल गेल्या गुरुवारी लागेपर्यंत श्यामराव व विजय यांचे निधन झाले होते. न्या. पंत यांनी उच्च न्यायालयाचा निकाल योग्य ठरवत, गणेश व अविनाश यांची जन्मठेप कायम केली, पण न्या. नरिमन यांना हा निकाल मान्य झाला नाही. त्यामुळे आता दोघांच्या अपिलाची तिसऱ्या न्यायाधीशापुढे सुनावणी होईल व त्यानुसार निर्णय होईल. दोन्ही अंदेकर बंधुंसाठी सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील उमेश आर. लळित यांनी काम पाहिले.
>मतभेदाचे कळीचे मुद्दे
रघुनाथ यास आपण इस्पितळात नेले, असे रोहिणीने साक्षीत सांगितले. मग त्याला रेखा कोळेकर नावाच्या महिलेने दाखल केल्याची नोंद इस्पितळात कशी?रघुनाथला भोसकून मारेकरी पळून गेल्यानंतर, रोहिणी तेथे आली व शकुंतलाही त्या वेळी नव्हती, अशी साक्ष रिक्षावाल्याने दिली, तरी रोहिणी व शकुंतला यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मानून त्यांच्या साक्षींवर विश्वास कसा ठेवावा?मारेकऱ्यांनी रघुनाथवर मांडीच्या सांध्यावर (ग्रॉईन) वार करताना आपण प्रत्यक्ष पाहिल्याचे रोहिणीने साक्षीत सांगितले, पण उत्तरीय तपासणीत त्या जागेवर कोणतीही जखम आढळून आली नाही.
घरासमोरच हल्ला होऊनही घरात न पळता रघुनाथ बाहेर एवढ्या दूरवर कशासाठी पळत गेला?