दिवाळीला पोलीस ठाण्यांवर मोर्चे, राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार - शेतकरी कर्जमुक्ती परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 02:20 AM2017-09-27T02:20:31+5:302017-09-27T02:20:40+5:30
सरकारच गुन्हेगार असल्याने येत्या २० आॅक्टोबरला बलिप्रतिपदेदिवशी सरकारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतक-यांचे मोर्चे काढण्याचा निर्धार येथील शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात आला.
जळगाव : केंद्र व राज्य सरकारने शेतक-यांची फसवणूक केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या असून यात सरकारच गुन्हेगार असल्याने येत्या २० आॅक्टोबरला बलिप्रतिपदेदिवशी सरकारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतक-यांचे मोर्चे काढण्याचा निर्धार येथील शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात आला.
नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावर मंगळवारी दुपारी ही परिषद पार पडली. व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, डॉ. बाबा आढाव, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, सुकाणू समितीचे समन्वयक अजित नवले, सत्यशोधक संघटनेचे किशोर ढमाले, सुकाणू समिती सदस्या सुशिला मोराणे, अशोक ढवळे, नामदेव गावडे, प्रतिभा शिंदे, एस.बी. पाटील आदी उपस्थित होते.
शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या, हेच या सरकारचे फलित
निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांना कर्जमुक्त करण्याचे तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन मोदी विसरले.
एक चहावाला लाल किल्ल्यावर भाषण देतो, याचा कष्टकºयांना अभिमान वाटला, मात्र आता २०१९ नंतर मोदींना कधीही लाल किल्ल्यावर जाता येणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी या वेळी दिला.
सरकारविरुद्धचा कृती कार्यक्रम
बलिप्रतिपदेला राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतकरी मोर्चे, ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचे श्राद्ध घालणे तसेच
२० नोव्हेंबर रोजी जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्यासाठी दिल्लीत धडक देण्याचीही घोषणा परिषदेत करण्यात आली.
सरकार सर्व आश्वासने विसरून चुकीचे निर्णय घेत असल्याने शेतकºयांसह अभियंते, अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. येथे कोणालाच ‘अच्छे दिन’ नसून तीन वर्षात शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या, हेच या सरकारचे फलित असल्याचा टोलाही शेट्टी यांनी लगावला.