धनगर आरक्षणाबाबत १५ दिवसांत निर्णय - मुख्यमंत्री
By admin | Published: January 4, 2015 07:29 PM2015-01-04T19:29:43+5:302015-01-04T19:29:43+5:30
धनगर आरक्षणासंदर्भात अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेऊन १५ दिवसांत योग्य निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ४ - धनगर आरक्षणासंदर्भात अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेऊन १५ दिवसांत योग्य निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासी आरक्षणात सरकार हात घालणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले असून अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्याबाई नगर असे नामकरण करण्यासंदर्भात सर्व पक्षांशी चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
रविवारी धनगर समाज आरक्षण परिषदेतर्फे नागपूरमध्ये अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका मांडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आरक्षणासंदर्भात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी आमचे सरकार तातडीने निर्णय घेण्यास कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. धनगर आरक्षणाचा निर्णय घेताच याविरोधात काही संघटना कोर्टात जातील. आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी अॅडव्होकेट जनरल यांचे मत जाणून घेऊ आणि १५ दिवसांत योग्य तो निर्णय जाहीर करु असे आश्वासनही त्यांनी दिले. आमचं सरकार हे आदिवासींच्या हिताचेही रक्षण करणारे असल्याने आदिवासी आरक्षण कोट्याला धक्का पोहोचणार नाही. त्यामुळे आदिवासी समाजानेही निश्चिंत राहावे असे फडणवीस यांनी नमूद केले.
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आणि अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्याबाई नगर असे नामकरण करावे अशी मागणी या अधिवेशनात करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन देणे टाळले. विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा विचार चांगला आहे. तर अहमदनगरचे अहिल्याबाई नगर असे नामकरण केल्यास वाद निर्माण होऊ नये म्हणून सर्व राजकीय पक्षांशी यासंदर्भात चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ असे फडणवीस यांनी सांगितले.