शाळांबाबत १५ दिवसांत निर्णय- आरोग्य मंत्री राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 09:21 AM2022-01-17T09:21:33+5:302022-01-17T09:21:56+5:30
टास्क फोर्स राज्याचा आढावा घेणार
जालना : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना शिक्षक संघटना आणि विशेष करून इंग्रजी शाळाचालकांकडून शाळा बंदच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली जात आहे. या महत्त्वाच्या निर्णयाबाबत आगामी पंधरा दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातील रुग्णवाढीचा वेग आणि तेथील उपाययोजनांचा आढावा घेऊन नंतर या शाळा सुरू करण्यासाठी विचार होऊ शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी येथे माध्यमांशी बोलताना दिली.
टोपे म्हणाले की, शाळांचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत रुग्णवाढीचे गुणोत्तर हे तुलनेने आज तरी जास्त दिसत आहे; परंतु यामुळे रुग्ण गंभीर होत नसल्याने ही एक समाधानकारक बाब म्हणावी लागेल. शाळा नव्याने सुरू करण्यासाठी आताच घाई करून चालणार नाही. बंद करण्याचा निर्णयदेखील सर्वांनी मिळून घेतला होता. त्यामुळे नव्याने सुरू करण्यावरही टास्क फोर्स तसेच अन्य वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येत आहे.
ज्या गावांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे, त्या गावांमध्येही केवळ ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत त्या सुरू करता येतील, अशी शक्यता टोपे यांनी अत्यंत सावध व्यक्त केली.
त्रिसूत्री प्रभावीपणे राबविण्याची गरज
रविवारी लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आता लसीकरणाबाबत जागृती वाढली असून, एक आणि दोन डोस घेतलेल्यांची संख्या आता लक्षणीय आहे. ती आणखी वाढविण्यासाठी आपण केंद्राकडे जादा डोसची मागणी केली असल्याचे टोपे म्हणाले. एकूणच ओमायक्रॉनचा धोका टळलेला नाही. कोरोनाची त्रिसूत्री आणखी प्रभावी राबविण्याची गरज असून, गर्दी टाळण्याचे आवाहनही टोपे यांनी केले.