2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय, अशोक चव्हाण यांची माहिती; मराठा उमेदवारांना मोठा दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 11:52 AM2021-07-06T11:52:35+5:302021-07-06T11:57:39+5:30

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यामुळे रखडलेली नोकर भरती प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हेतूने हे निर्णय घेण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी नियुक्त झालेल्या तसेच स्थगिती आल्यानंतर खुल्या प्रवगार्तून गुणवत्तेनुसार ११ महिन्यांच्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना या निर्णयाचा लाभ मिळेल.

Decision to retain 2014 ESBC candidates in service says Ashok Chavan | 2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय, अशोक चव्हाण यांची माहिती; मराठा उमेदवारांना मोठा दिलासा 

2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय, अशोक चव्हाण यांची माहिती; मराठा उमेदवारांना मोठा दिलासा 

Next

मुंबई : २०१४ च्या ईएसबीसी उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून, उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी झालेल्या नियुक्त्या तसेच स्थगिती आल्यानंतर ११ महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केला.

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यामुळे रखडलेली नोकर भरती प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हेतूने हे निर्णय घेण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी नियुक्त झालेल्या तसेच स्थगिती आल्यानंतर खुल्या प्रवगार्तून गुणवत्तेनुसार ११ महिन्यांच्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना या निर्णयाचा लाभ मिळेल.

मराठा आरक्षणाचे न्यायालयीन प्रकरण, त्यावर आलेली स्थगिती व अंतिम निकाल, तसेच कोरोनामुळे अनेक नोकर भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. त्यातील अनेक एसईबीसी उमेदवारांचे वय विहित मर्यादेपलीकडे चालले होते, शिवाय एसईबीसी आरक्षण रद्दबातल झाल्यामुळेही अनेक विद्यार्थी वयोमर्यादा ओलांडणार होते. 

५०% मर्यादा शिथिल करा, केंद्राला शिफारस करणारा ठराव विधिमंडळात मंजूर -
मराठा समाजाला एसईबीसीतून आरक्षण देण्यामधील ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करण्यासाठी संविधानात  योग्य सुधारणा करून ही मर्यादा शिथिल  करण्याची शिफारस करणारा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सोमवारी मंजूर झाला.  सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा ठराव मांडला. विधानसभेत चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या कायदेशीर सद्यस्थितीबाबत विस्तृत विवेचन केले.

विरोधकांना सुनावले
खा. संभाजीराजे यांचा एकमेव अपवाद वगळता एकाही नेत्याने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर केंद्राला सवाल केला नाही, असे चव्हाण यांनी विरोधकांना सुनावताना सांगितले. 

तज्ज्ञांची मते मागविणार
९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर निर्बंध येण्यापूर्वी एसईबीसीमधून निवडीसाठी शिफारस झालेल्या परंतु, अद्याप नियुक्त्या न मिळालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञांचे कायदेशीर मत मागवण्यात आले असून, त्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

खुल्या प्रवर्गातून पर्याय
अपूर्णावस्थेतील अर्थात अद्याप निवड यादी न लागलेल्या नोकर भरती प्रक्रियांमधील एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यू  एस किंवा खुल्या प्रवर्गातून पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला असून, उमेदवारांनी निवडलेल्या पर्यायानुसार या निवड प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना राज्य लोकसेवा आयोग तसेच अन्य निवड मंडळांना देण्यात आल्याचे  चव्हाण म्हणाले.

वयोमर्यादा ४३ वर्षे 
एसईबीसीच्या अशा उमेदवारांना दिलासा देण्यासाठी त्यांच्यासाठी वयोमर्यादा ४३ वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातील सवलतीचा लाभही दिला जाणार आहे.
 

 

Web Title: Decision to retain 2014 ESBC candidates in service says Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.