सुरक्षित प्रवासाकरिता लवकरच निर्णय
By Admin | Published: July 22, 2016 01:41 AM2016-07-22T01:41:57+5:302016-07-22T01:41:57+5:30
देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांमधील वाहतुकीच्या दृष्टीने गोवा राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत धोकादायक बनलेला आहे.
अलिबाग : देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांमधील वाहतुकीच्या दृष्टीने गोवा राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत धोकादायक बनलेला आहे. हा महामार्ग विशेष करून पळस्पे (पनवेल) ते इंदापूर या टप्प्यातील महामार्ग वाहतुकीच्या आणि प्रवाशांच्या जीविताच्या दृष्टीने सुरक्षित करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासूनच प्रयत्न सुरू केले असल्याचे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या महामार्गाचे काम करणाऱ्या दोन्ही ठेकेदार कंपन्यांचे मालक व संचालक तसेच संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची विशेष बैठक २६ जुलै रोजी बोलावली असून या बैठकीत गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेवून तत्काळ अमलात आणणार असल्याचा शब्द त्यांनी दिला.
गुरुवारी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे पत्रकारांशी संवाद साधताना रायगडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील उपस्थित होते. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा व अपघातविषयक सरकारी राष्ट्रीय अहवालात गोवा राष्ट्रीय महामार्गाची प्रवासास धोकादायक अशा सदरात गणना झाली आहे. या महामार्गावरील पळस्पे(पनवेल) ते इंदापूर या टप्प्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु झाल्यानंतर याच टप्प्यात अपघातजन्य ४२ नवीन ठिकाणे निर्माण झाली व त्यापैकी सात ठिकाणी मोठे व गंभीर अपघात झाले. त्यात मोठ्या प्रमाणात मानवी व वित्तीय हानी झाली. परंतु या अपघातांना वाहन चालकाची चूक कारणीभूत नाही तर महामार्गाची धोकादायक परिस्थिती कारणीभूत असल्याचेही निष्पन्न झाल्याचे बुरडे यांच्या यावेळी लक्षात आणून दिले. याच पार्श्वभूमीवर तीन दिवसांच्या आपल्या कोकण परिक्षेत्राच्या दौऱ्यात आपण जाणीवपूर्वक येणारा गणेशोत्सव विचारात घेवून गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेच्या मुद्यासच प्राधान्य दिल्याचे बुरडे यांनी सांगितले.
महाडकडून येताना महामार्गाच्या सद्यस्थितीची पाहणी करुन, महावीर आणि सुप्रिम या दोन्ही महामार्ग बांधकाम करणाऱ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी बी. एस. अगरवाल व आर. डी. गोवेकर यांना बुधवारी पेण येथे बोलावून घेवून तातडीने प्राथमिक स्तरावरची बैठक घेवून, महामार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अपेक्षित सूचना त्यांना दिल्या आहेत. याबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतिम निर्णय २६ जुलै रोजी घेतला जाईल, असे बुरडे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
>कोकण रेल्वे पोलीस दल स्वतंत्र नाही
कोकण रेल्वेच्या प्रारंभापासूनच आजतागायत स्वतंत्र कोकण रेल्वे पोलीस दल अस्तित्वातच न आल्याने, कोकण रेल्वे मार्गावरील वा त्या संबंधित कोणत्याही गुन्ह्याचा तपास वा आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पोलिसांनाच काम करावे लागते. परिणामी स्थानिक पोलिसांवर अतिरिक्त ताण पडत असल्याने त्यांच्या नियमित कामांवर त्याचा विपरित परिणाम कोकण रेल्वे प्रारंभापासूनच झाला आहे. तरी ही पोलिसांची बांधिलकी ही जनसामान्यांशी असल्याने कोकणातील सर्व जिल्हा पोलीस कोकण रेल्वेस सहकार्य करीत आले आहेत. कोकण रेल्वे पोलीस दल अस्तित्वात येईपर्यंत ते काम करतील, अशी भूमिका एका प्रश्नाला उत्तर देताना बुरडे यांनी स्पष्ट केली. राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त सहयोगातून स्वतंत्र कोकण रेल्वे पोलीस दलाची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर असून लवकरच त्यात निर्णय अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले.
>गस्ती नौकांची दुरु स्ती
कोकण परिक्षेत्रातील ५१० सागररक्षक दलांच्या माध्यमातून किनारी सागरी सुरक्षा व्यवस्थेकरिता स्थानिक गुप्त माहिती सातत्याने उपलब्ध होत असते. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून प्राप्त सागरी गस्ती नौकांच्या दुरुस्तीची काही काळापूर्वी समस्या होती परंतु विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दुरुस्ती खर्चाकरिता दिलेल्या विशेषाधिकारांमुळे ही समस्या दूर झाली आहे.