समीरच्या अर्जावर आज निर्णय
By Admin | Published: November 17, 2015 11:49 PM2015-11-17T23:49:26+5:302015-11-18T00:08:42+5:30
पानसरे हत्या प्रकरण : अर्ज नामंजूर करण्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील संशयित समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली) याला तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी न्यायालयासमोर सांगायच्या आहेत. त्यासाठी तो लेखी पत्रव्यवहार करू शकतो, त्याला कारागृहात कायदेशीर मदत मिळू शकते. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्याची गरज नाही. त्याच्या वकिलांनी केलेला अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद मंगळवारी सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्यासमोर केला. त्यावर दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तिवादावर आज, बुधवारी अंतिम निर्णय होणार आहे.
पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर गायकवाड याला १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, आरोपीचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कारागृहात गायकवाड याची भेट घेतली होती. त्यावेळी त्याने तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपणाला सांगितल्या आहेत; त्या त्याला न्यायालयात सांगायच्या आहेत. त्यामुळे सुनावणीसाठी त्याला न्यायालयात हजर करावे, असा अर्ज अॅड. इचलकरंजीकर यांनी न्या. डांगे यांना सादर केला होता. त्यावर सरकारी वकिलांना म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. सध्या गायकवाड हा कळंबा कारागृहात असून, त्याच्या कोठडीची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत आहे.
अॅड. बुधले यांनी सरकारी पक्षाच्या वतीने मंगळवारी आरोपीच्या अर्जावर युक्तिवाद सादर केला. त्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी जी मागणी केली केली आहे, त्यासाठी आदेश देण्याची आवश्यकता नाही. अशी कार्यपद्धती अवलंबण्याची गरज नाही. न्यायालय आरोपीला ‘लेखी म्हणणे दे’ असे सांगू शकत नाही. आरोपीचे वकील न्यायालयात त्याच्या वतीने अर्ज दाखल करू शकतात. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी आदेश देण्याची गरज नाही. आरोपी ज्या कारागृहात आहे, त्या ठिकाणी कागद, पेन उपलब्ध आहेत. जर काही अडचणी असतील तर त्या कारागृह प्रशासन सोडवीत असते. कारागृहातील कैदी पत्रे पाठवू शकतात. महाराष्ट्र कारागृह सुविधा १९६२, नियम ३४ प्रमाणे कारागृहात आरोपीला कायदेशीर मदत मिळू शकते. त्यामुळे न्यायालयास जे काही सांगायचे आहे, ते आरोपीने पत्रव्यवहाराद्वारे सांगावे. त्यासाठी त्याला न्यायालयात येण्याची गरज नाही. त्यामुळे आरोपीच्या वकिलांनी केलेला अर्ज नामंजूर व्हावा, असा युक्तिवाद मांडला.
त्यानुसार न्या. डांगे यांनी दोन्ही वकिलांच्या युक्तिवादावर आज, बुधवारी अंतिम निर्णय दिला जाईल, असे सांगितले. यावेळी आरोपीचे वकील एम. एम. सुहासे, समीर पटवर्धन, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक माधव पडिले, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
समीरला सांगावयाच्या गोष्टी तो लेखी पत्रव्यवहाराद्वारे न्यायालयाला सांगू शकतो. कायद्यात तशी तरतूद आहे.
समीरच्यावतीने त्याचे वकील न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात. त्यामुळे समीरला न्यायालयात हजर करण्याची गरज नाही.
पत्रव्यवहारातील अडचणी कारागृह प्रशासन सोडवेल.