सराफांच्या बंदवर आज निर्णय?
By Admin | Published: April 5, 2016 01:07 AM2016-04-05T01:07:50+5:302016-04-05T01:07:50+5:30
अबकारी कर कायद्याविरोधात देशभरातील सराफांनी पुकारलेल्या बेमुदत बंदवर मंगळवारी दिल्लीत देशभरातील सराफ संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
पुणे : अबकारी कर कायद्याविरोधात देशभरातील सराफांनी पुकारलेल्या बेमुदत बंदवर मंगळवारी दिल्लीत देशभरातील सराफ संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत बंद सुरू ठेवायचा की नाही यावर
निर्णय होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. फत्तेचंद रांका यांनी दिली.
केंद्र सरकारने आणलेल्या अबकारी कर कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील सराफ संघटनांचा बेमुदत बंद सुरू आहे. बंदच्या कालावधीत संघटनांनी ठिकठिकाणी विविध मार्गाने आंदोलन करून सरकारचा निषेध केला. पुण्यात राज्यभरातील सराफांनी एकत्र येत मोठा मोर्चा काढला. बंदला महिना उलटून जाऊनही त्यावर केंद्र सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा बंद मिटण्याची चिन्हे सध्यातरी
दिसत नाहीत. तीन दिवसांवर गुढीपाडवा सण आला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणादिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सर्वसामान्यांसह सराफांसाठीही हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवसापर्यंत सराफांचा
संप मिटेल, अशी आशा सर्वसामान्यांना आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्य सराफ सुवर्णकार असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती देताना अॅड. रांका म्हणाले, बैठकीमध्ये बंदचा आढावा घेण्यात आला. बहुतेक सदस्य मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे आज सर्व सदस्यांना दि. ६ एप्रिलपर्यंत दुकाने बंदच ठेवण्याचे कळविण्यात आले आहे.
मंगळवारी दिल्लीत देशातील संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. या बैठकीत बंदवर निर्णय
घेतला जाईल. त्यानुसार
बुधवारी राज्य असोसिएशनची
बैठक घेऊन त्या निर्णयावर
चर्चा होईल.