अधिस्वीकृतीचा लवकरच निर्णय
By admin | Published: October 22, 2016 11:28 PM2016-10-22T23:28:13+5:302016-10-22T23:28:13+5:30
दिल्ली येथे होणाऱ्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमध्ये देशातील विद्यापीठांच्या अधिस्वीकृतीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन परिषदेचे
राहुरी (अहमदनगर): दिल्ली येथे होणाऱ्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमध्ये देशातील विद्यापीठांच्या अधिस्वीकृतीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन परिषदेचे महासंचालक डॉ़ त्रिलोचन महापात्र यांनी केले़
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३१ व्या पदवी प्रदान समारंभात डॉ़ महापात्र यांनी पदवीधारकांनी नोकरी शोधत फिरण्याऐवजी उद्योग उभारून इतरांना रोजगार मिळवून द्यावा, असे सुचविले़ उद्योग व रोजगाराला चालना देणे हेच केंद्र सरकारचे धोरण असल्याचे स्पष्ट केले़ उसासाठी ठिबकाचा वापर वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले़
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते ७२ विद्यार्थ्यांना पीएच़ डी़, ३५५ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, ५ हजार ३७२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली़ ज्ञानेश्वर पाचे, चैतन्य धुमाळ, निखिल पवार, रेणुका पाटील, प्रियांका चव्हाण, निकिता सोनवणे, बालाजी घुले यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले़
कुलगुरू डॉ़ के. पी़ विश्वनाथ म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार सुरू आहेत़’ विद्यापीठाने आजपर्यंत ४१ हजार ९३९ पदव्या दिल्याचेही त्यांनी सांगितले़ पालकमंत्री राम शिंदे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह प्रथमच आजी-माजी नऊ कुलगुरूंनी पदवी प्रदान समारंभात हजेरी लावली़ (प्रतिनिधी)
उत्पन्न वाढविण्याचे लक्ष्य
शेतीमध्ये मजुरांची कमतरता असून, यांत्रिकीकरणाची आवश्यकता आहे़ जमीनधारणा क्षेत्र कमी असल्याने यांत्रिकीकरणाला मर्यादा येत आहे़ पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवयाचे आहे़ त्यासाठी कृषी, उद्यानविद्या व पशुसंवर्धन यांच्या एकत्रिकरणातून काढणी पश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धनावर भर देण्यात येणार आहे़ कृषिपदवीधारकांनी ही जबाबदारी घ्यावी़
- त्रिलोचन महापात्र, महासंचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद