राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय अद्याप नाहीच; विद्यार्थी, शिक्षणसंस्थांना सरकारी निर्णयाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 08:09 AM2021-01-21T08:09:46+5:302021-01-21T08:11:37+5:30
५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून २० जानेवारीपर्यंत घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र, अद्याप राज्यातील महाविद्यालये निर्णयाच्या प्रतीक्षेतच आहेत.
मुंबई : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेऊन ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून २० जानेवारीपर्यंत घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र, अद्याप राज्यातील महाविद्यालये निर्णयाच्या प्रतीक्षेतच आहेत. महाविद्यालये कधी सुरू हाेणार, परीक्षांचे काय, याबाबत विद्यार्थी अजूनही संभ्रमात आहेत.
उदय सामंत यांनी मागील फेसबुक संवादात दिलेल्या माहितीनुसार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेण्यात येणार हाेता. त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ठेवून त्यावर चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र या संदर्भातील कोणताही आढावा अथवा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची किंवा मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक अद्याप झाली नसल्याचे समजते. याच कारणास्तव महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय बारगळल्याचे समोर आले आहे.
अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच पारंपरिक महाविद्यालयांतील इतर प्रात्यक्षिकांसाठी तरी महाविद्यालये खुली करावीत, अशी निवेदने आणि पत्रे उच्च व तंत्रशिक्षण विभागाला शैक्षणिक संस्था, विद्यार्थ्यांकडून पाठविली जात आहेत. महाविद्यालये सुरू न झाल्याने अनेक पारंपरिक, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रखडल्या आहेत.
‘ऑनलाइन शिक्षण हा केवळ पर्याय’
ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग हा शिक्षणाला पर्याय असला तरी पूरक व उपयुक्त नसल्याने अनेक फार्मसी, अभियंत्रिकी, व्यवस्थापन, आर्किटेक्चरच्या व इतर पारंपरिक शाखांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने लवकरात लवकर सरकारची मंजुरी घेऊन महाविद्यालये सुरू करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी संबंधित विद्यार्थ्यांकडून हाेत आहे.
महिनाअखेरपर्यंत निर्णय
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय महिनाअखेरपर्यंत घेण्यात येईल, असे संकेते दिले आहेत.