CoronaVirus : शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर - सीताराम कुंटे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 09:35 AM2021-08-12T09:35:19+5:302021-08-12T09:35:35+5:30

"ज्या जिल्ह्यात किंवा शहरात रुग्ण संख्या कमी झाली आहे, किंवा पूर्णपणे नाहीशी झाली आहे, अशा जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचे नियोजन करता येईल."

Decision to start school postponed says Sitaram Kunte | CoronaVirus : शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर - सीताराम कुंटे

CoronaVirus : शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर - सीताराम कुंटे

Next

अतुल कुलकर्णी 

मुंबई : राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर गेला आहे. याविषयीचे विस्तृत आदेश लवकरच काढले जातील, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (Decision to start school postponed says Sitaram Kunte)

लहान मुलांसाठीचा टास्क फोर्स मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली तयार केला आहे. त्याशिवाय डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली देखील एक टास्क फोर्स कार्यरत आहे. या दोघांसह टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित आदींसह ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत चाललेली आहे त्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांची एक बैठक मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. रात्री उशिरा ही बैठक संपली. त्यानंतर लोकमतशी बोलताना कुंटे म्हणाले, बंगळुरूमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळत आहेत. तसेच इंडोनेशियामध्येही लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होत असल्याची माहिती पेडियाट्रिक टास्क फोर्सने बैठकीत दिली आहे. त्यांनी काही कागदपत्रे आणि फॉर्म देखील तयार करून बैठकीत दाखवले. लहान मुलांसाठी या आजारावर उपयुक्त औषधे नाहीत. शिवाय लहान मुलांना आपण लसीकरण ही सुरू केलेले नाही. त्यामुळे एकदम शाळा उघडल्या तर ते अडचणीचे होईल, अशी प्रतिक्रिया सर्व तज्ञ डॉक्टरांनी दिल्याचे कुंटे यांनी स्पष्ट केले. 

ज्या जिल्ह्यात किंवा शहरात रुग्ण संख्या कमी झाली आहे, किंवा पूर्णपणे नाहीशी झाली आहे, अशा जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचे नियोजन करता येईल. नंदुरबार, धुळे, लातूर, अशा काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण कमी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करता येतील. पण हे जिल्हे किंवा अशी शहरे अपवाद असतील. ज्या ठिकाणी रुग्ण संख्या अद्यापही कमी होत नाही, किंवा नियंत्रणात येत नाही, असे आकडेवारीवरून समोर येत असेल त्या जिल्ह्यांमध्ये सरसकट शाळा सुरू करता येणार नाहीत, असे सांगून मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले, १७ तारखेपासून शाळा सुरू करण्यासाठी जे आदेश काढले होते, त्यात कशा पद्धतीने सुधारणा करता येतील यावरही तातडीने निर्णय घेतला जाईल. मात्र लगेच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेता येणार नाही.

 ज्या जिल्ह्यात सलग तीन आठवडे एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही, असे शहर किंवा जिल्हे शाळा सुरू करण्यासाठी पात्र धरावेत, अशी ही चर्चा आजच्या बैठकीत झाली. पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या प्रमुखांनी जी उदाहरणे दिली आहेत, त्यांचाही अभ्यास करून तातडीने त्याची माहिती गोळा करण्याचे आदेश आपण दिल्याचे कुंटे यांनी सांगितले.
 
शहर आणि जिल्ह्याची परिस्थिती पाहूनच शाळा सुरू केल्या जातील. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली जाईल. शालेय शिक्षण विभागाचे सचिव आणि अन्य अधिकारीही आजच्या बैठकीला उपस्थित होते असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

Read in English

Web Title: Decision to start school postponed says Sitaram Kunte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.