‘पेट्रोलपंप कारवाईचा निर्णय शासन घेणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:10 AM2017-07-19T01:10:59+5:302017-07-19T01:10:59+5:30
देशभर पसरलेल्या पेट्रोल घोटाळ्याच्या व्याप्तीचा संपूर्ण तपशील शासनस्तरावर सादर करण्यात आला आहे. याशिवाय तपासातून मिळालेली माहिती संबंधित
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : देशभर पसरलेल्या पेट्रोल घोटाळ्याच्या व्याप्तीचा संपूर्ण तपशील शासनस्तरावर सादर करण्यात आला आहे. याशिवाय तपासातून मिळालेली माहिती संबंधित पेट्रोल कंपन्यांनाही दिली आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्ये पेट्रोलपंपांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनस्तरावर किंवा पेट्रोलियम कंपन्यांच्या स्तरावरच घेतला जाईल, अशी माहिती ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी मंगळवारी दिली.
या घोटाळ्याचा सूत्रधार प्रकाश नुलकरला कर्नाटकातून अटक केल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याचे स्पष्ट झाले. ा्रकाश नुलकरचे विदेशातील हस्तक कोण आहेत, त्यांच्याशी त्याचे आर्थिक व्यवहार नेमके कसे होते या मुद्द्यांवर तपास सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी दिली. त्याच्या काही साथीदारांचा तपशील मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आणखी वाढणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
जवळपास एक महिन्यापासून ठाणे पोलीस पेट्रोल घोटाळ्याचा तपास करीत आहेत. गुजरात, मध्य प्रदेशसह ईशान्येकडील काही राज्यांमध्येही पेट्रोलपंपांवर ग्राहकांची राजरोस फसवणूक होत असल्याचे आरोपींच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. पेट्रोलपंपांवर अशा प्रकारची हेराफेरी करण्याचे प्रमाण दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
या प्रकरणाची व्याप्ती पाहता, तपासाची संपूर्ण माहिती शासनस्तरावर सादर केली आहे. संबंधित पेट्रोलियम कंपन्यांनाही आवश्यक तो तपशील दिला आहे. त्यामुळे इतर राज्यांमधील पेट्रोलपंपावर कारवाई करण्याचा निर्णय शासनस्तरावर किंवा पेट्रोलियम कंपन्यांकडून घेतला जाईल, असे ते म्हणाले. ठाणे पोलिसांनी केवळ राज्यातील कारवाईकडे लक्ष केंद्रित केले आहे. आरोपींकडून माहिती मिळेल, त्यानुसार कारवाई सुरू राहील, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.