मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 08:57 PM2022-04-06T20:57:50+5:302022-04-06T20:57:59+5:30

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठाणे आणि कल्याण दोन्ही उपकेंद्रांना दिघे यांचे नाव देण्यावर एकमत

Decision to name the Thane sub-center of Mumbai University after Dharmaveer Anand Dighe | मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय

googlenewsNext

ठाणे-मुंबई विद्यापीठाच्याठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ठाणे  आणि कल्याण या दोन्ही उपकेंद्रांना हेच नाव कायम ठेवण्याबाबत देखील या बैठकीत एकमत झाले आहे. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निर्णयाचे हे पत्र त्यांना सुपूर्द केले. 

धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे शहरातील सर्वांगीण योगदान लक्षात घेऊन ठाणे शहरात बालकुम परिसरात तयार करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला त्यांचे नाव देण्यात यावे अशी शिफारस राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यापीठाला केली होती. तशी मागणी करणारे  पत्रच त्यांनी विद्यापीठाला लिहिलं होतं.

याबाबत मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या झालेल्या बैठकीत धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील योगदान पहाता त्यांचेच नाव या उपकेंद्राला देणे योग्य ठरेल याबाबत समितीच्या सदस्यांचे एकमत झाले. याशिवाय मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राला देखील हेच नाव कायम ठेवण्याचे देखील या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. 

यावेळी बोलताना श्री शिंदे यांनी 'गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे(Anand Dighe) यांचे नाव विद्यापीठाच्या ठाणे केंद्राला दिले जाणे हा त्यांचा सन्मान असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या योगदानाचा हा गौरव असल्याचे मत व्यक्त केले. दिघे साहेबानी आयुष्यभर अनेक गरीब आणि गरजू विद्यार्थांना महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले. जिल्ह्यातील 10 वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परिक्षेआधी सराव करता यावा यासाठी सराव परीक्षांचे आयोजन केले. गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यांच्या याच कार्याची दखल मुंबई विद्यापीठाने घेतली याचा आज विशेष आनंद होत असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले'. 

धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव विद्यापीठाच्या उपकेंद्राला देण्यात यावे यासाठी सिनेट सदस्य तथा ठाण्यातील सी.डी. देशमुख संस्थेचे संचालक श्री. महादेव जगताप यांनी विशेष प्रयत्न केले. लवकरच या दोन्ही उपकेंद्रांचा नामकरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल असे विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Decision to name the Thane sub-center of Mumbai University after Dharmaveer Anand Dighe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.