छोट्या गाड्यांच्या टोलबंदीबाबत लवकरच निर्णय
By admin | Published: August 27, 2015 02:12 AM2015-08-27T02:12:50+5:302015-08-27T02:12:50+5:30
शहरातील एंट्री पॉर्इंटवर टोल बंद करण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल लवकरच येणार असून त्यानंतर हलक्या चारचाकी वाहनांवरील टोलबंदी करण्याबाबत
मुंबई : शहरातील एंट्री पॉर्इंटवर टोल बंद करण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल लवकरच येणार असून त्यानंतर हलक्या चारचाकी वाहनांवरील टोलबंदी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे संकेत सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुढील आठवड्यात कोल्हापूरच्या टोलबाबत मंत्रालयात बैठक होईल आणि त्यात मुंबईबाबतही चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटातील आडोशी येथील बोगद्याजवळ दरड कोसळल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. १९ जुलैला झालेल्या दुर्घटनेनंतर द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुमन दत्ताराम पंडित आणि बांधकाम विभागाचे माजी सचिव एम. व्ही. पाटील समितीचे सदस्य असतील. समिती ३० सप्टेंबरपर्यंत शासनाला अहवाल सादर करणार आहे.
समिती दरड कोसळण्याची कारणे शोधेल, देखभालीची जबाबदारी निश्चित करेल, विविध यंत्रणा आणि अधिकाऱ्यांच्या कामात दोष आढळल्यास त्याचीही नोंद घेतली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)