बारावीतील चुकीच्या प्रश्नांवर उद्या निर्णय!
By Admin | Published: March 9, 2015 01:34 AM2015-03-09T01:34:46+5:302015-03-09T01:34:46+5:30
इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणित आणि रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आल्याने हे रसायनशास्त्राचे ५ आणि गणिताचे ४
पुणे : इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणित आणि रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आल्याने हे रसायनशास्त्राचे ५ आणि गणिताचे ४ गुण विद्यार्थ्यांना सरसकट द्यायचे की कसे, याबाबतचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत होणार असल्याचे समजते़
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विज्ञान शाखेतील गणित आणि रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये चुकीचे प्रश्न विचारण्यात आले होते़
प्रश्नपत्रिकेत किती चुका झाल्या व विद्यार्थ्यांना किती गुण दिले जाणार यापासून राज्य शिक्षण मंडळाचे अधिकारी अनभिज्ञ असले तरी प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न चुकले असल्यास विद्यार्थ्यांना नियमानुसार गुण दिले जातील, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी चुकीच्या प्रश्नांचे गुण मिळणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अभ्यास मंडळाच्या सदस्यांकडून प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे सांगितले जात असले तरी राज्य शिक्षण मंडळाने चुकांबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. (प्रतिनिधी)