बोअरवेल रिचार्जचा सोसायट्यांचा निर्णय
By admin | Published: May 17, 2016 04:13 AM2016-05-17T04:13:03+5:302016-05-17T04:13:03+5:30
ठाण्यातील सोसयट्यांनी पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन विविध उपाययोना आखण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे : ठाण्यातील सोसयट्यांनी पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन विविध उपाययोना आखण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून ठाण्यातील तारांगण, वेदांत कॉम्प्लेक्स, विम्बलटेन, निळकंठ हाईट्स, गावंडबाग, लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्स या सोसायट्यांनी बोअरवेल रिचार्ज करण्याचे काम हाती घेतले आहे. पावसाळ््याच्या आत हे काम पूर्ण होईल असा विश्वास या सोसायट्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे शहरवासियांनादेखील भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. भविष्यात हा गंभीर प्रश्न उद्भवू नये म्हणून अनेक सोसायट्या आपापल्या स्तरावर उपायोयजना करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे सिटीझन व्हॉईसदेखील पाणी बचतीवर जनजागृती करीत आहे. भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू नये म्हणून प्रत्येक सोसायटीने बोअरवेल रिचार्ज करावे असे आवाहन ठाणे सिटीझन व्हॉईसच्या माध्यमातून करण्यात आले. या सोसायटीच्या आवाहनाला ठाण्यातील सहा सोसायट्यांनी प्रतिसाद दिला असून, काही दिवसांतच कामाला सुरुवात करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आमच्या संस्थेच्या माध्यमातून सर्वच सोसायट्यांनी बोअरवेल रिजार्च करावे म्हणजे भविष्यात पाणी टंचाई उद्भवणार नाही. आमच्या आवाहनाला तारांगण, वेदांत कॉम्प्लेक्स, विम्बलटेन, निळकंठ हाईट्स, गावंडबाग, लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्स या सोसायट्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ठाणे सिटीझन व्हॉईसचे संस्थापक कॅसबर आॅगस्टीन यांनी लोकमतला सांगितले.
असे केले जाणार रिचार्ज
सोसायट्यांमध्ये असलेल्या बोअरवेलच्या भोवती चार ते सहा फुटांचा खड्डा खणला जाणार आहे. पावसाळ््यात टेरेसवर पडणारे पाणी हे रिचार्जपीटमध्ये साठवले जाईल आणि साठवलेले पाणी फिल्टर करुन ते बोअरवेलमध्ये सोडण्यात येणार आहे. पावसाळ््यानंतर या पाण्याचा वापर करणे सोयीस्कर ठरेल असे आॅगस्टीन यांनी सांगितले.
‘लोकमत’चे ‘जलमित्र’ अभियान स्तुत्य
लोकमतच्या जलमित्र अभियानाला आमचा निश्चितच पाठिंबा आहे. लोकमतचा हा उपक्रम स्तुत्य आहे. सर्वांनी पाणी वाचविले पाहिजे. पाण्याचा गैरवापर करु नये. पुढच्या वर्षीच्या पाण्याचे नियोजनासाठी आताच धडपड केली पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टींगसारख्या प्रकल्पासाठी खर्च येतो पण खर्चापेक्षा त्याचा भविष्यात काय फायदा आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे आणि आतापासूनच याची सुरुवात करायला हवी.
- मोहन पुत्रन, चेअरमन, निळकंठ हाईट्स, ठाणे