भिवंडीतील कापड उद्योगास उतरती कळा
By admin | Published: July 18, 2016 04:00 AM2016-07-18T04:00:47+5:302016-07-18T04:00:47+5:30
आठ लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग असल्याने या व्यवसायातील तेजीमंदीचा परिणाम शहरातील नागरिकांवर होत असतो.
भिवंडी- आठ लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग असल्याने या व्यवसायातील तेजीमंदीचा परिणाम शहरातील नागरिकांवर होत असतो. गेल्या काही महिन्यांपासून कापड व्यवसायातील मंदीचा अलीकडेच झालेल्या ‘रमजान ईद’च्या काळात चांगलाच प्रभाव जाणवला. अशीच स्थिती राहिली तर पुढे काय होईल, या भीतीने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. भिवंडीत बनवलेल्या कापडास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तसेच त्यापासून बनवलेले रेडिमेड कपडे परदेशी जातात. मात्र, हा सर्व व्यवहार मुंबईतील मोठे कापड व्यापारी करीत असल्याने सर्वसाधारण विणकर व कापड उत्पादक यांना योग्य भाव न मिळाल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक होते. शासनाने शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय जसा घेतला, तसाच यार्न दलाल, कापड व्यापारी व मास्टर विव्हर्स यांना वगळून थेट व्यापाऱ्यांपर्यंत विणकर व यंत्रमागधारक यांचा माल पोहोचवून त्यांच्या मालास योग्य भाव मिळवून दिला पाहिजे.
परदेशात साध्या कापडाच्या बाहुलीवर त्यास लागलेले सामान व त्याची किंमत प्रिंट केलेली असते. मात्र, भारतातील सूत गिरण्यांतून निघालेल्या यार्नच्या गोळ्यावर (कोम) किंमत लिहिलेली नसते. त्यामुळे या कोमपासून कापड उद्योगात सट्टाबाजारी सुरू होते. विणकर व छोटे कापड व्यापारी त्याचे बळी ठरतात. शहरात चार यंत्रमागांपासून हजारो यंत्रमाग चालवणारे व्यापारी आहेत. परंतु, मास्टर विव्हर्ससारखे मोठे व्यापारी स्वत:च्या फायद्यासाठी कापडाचा माल विणून देणाऱ्याचा कधीच विचार करीत नाही. ते कमी मजुरी देऊन विणकरांकडून कापड विणून घेतात आणि बाजारात जास्त भावाने आपले कापड विकतात. शासनदरबारी या सर्व व्यवहाराची कोणतीही नोंद नसल्याने विणकरांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
मास्टर विव्हर्सच्या अशा वर्तनास कंटाळून काही व्यापाऱ्यांनी आपला ग्रुप बनवून आपल्या कापड व्यवसायास स्थैर्य दिले. मात्र, त्यांचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. कापड विणून देणे व स्वत: कापड बनवून विकणे, असे दोन प्रकारचे कापड उत्पादक यंत्रमागधारक आहेत. मात्र, कापड व यार्न मार्केटमधील सट्टेबाजारी यामुळे त्यांना स्थैर्य लाभत नाही. कधीकधी कामगार नसतात तर कधी मास्ट विव्हर्स कापड विणण्यासाठी बिम देत नाही. अशा स्थितीत यंत्रमागास लागणारा खर्च सुरू असतो. त्यामुळे अनेकदा यंत्रमागधारक अथवा यंत्रमागचालक कर्जबाजारी होतो.
शहरातील कापड व्यवसायास ६० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली असतानादेखील या व्यावसायिकांना संघर्षाचा सामना करावा लागत आहे. भारताबाहेरील कापड विक्रीस येत असल्याने कापड बाजारात भाव मिळत नसल्याची कापड विक्रेत्यांची तक्रार आहे. कापड बनवण्यासाठी कमी खर्च यावा, यासाठी शासनाच्या सवलती मिळवण्याकरिता कापड व्यापारी व मजुरीने बिम चालवणाऱ्या विणकरांची धडपड सुरू आहे. मात्र, सवलती मिळवल्यानंतरही या व्यवसायास स्थैर्य देण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांकडून होत नसल्याने वारंवार विविध समस्यांचा सामना विणकरांना करावा लागत आहे.
राज्यातील यंत्रमागधारकांनी आधुनिक व जास्त उत्पादन देणारे यंत्रमाग लावावेत, यासाठी केंद्राने वारंवार योजना जाहीर केल्या. मात्र, ८० टक्के यंत्रमाग जुन्या धाटणीचे आहेत. नवीन अॅटोमॅटीक यंत्रमाग लावण्यास स्थानिक व्यापारी तयार नाही. त्याचा परिणाम कापड बाजारात दिसतो. मार्केटमधील तेजीच्या काळात व्यवसाय स्थिर करण्याचा प्रयत्न करीत नाही.