हज २०१९ ची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:21 AM2018-10-19T05:21:21+5:302018-10-19T05:21:27+5:30
मुंबई : हज २०१९ची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी बुधवारी हज हाउसमध्ये केली. २०१८ची हज यात्रा ...
मुंबई : हज २०१९ची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी बुधवारी हज हाउसमध्ये केली. २०१८ची हज यात्रा समाप्त झाल्यानंतर, अवघ्या महिन्याभरात पुढील वर्षीच्या यात्रेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रक्रियांना पुरेसा वेळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१८ आॅक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत हजसाठी अर्ज भरण्याची आॅनलाइन प्रक्रिया होईल. त्यानंतर २२ आॅक्टोबरपासून आॅफलाइन प्रक्रिया सुरू होईल. यंदाची हज यात्रा १०० टक्के अनुदानमुक्त व १०० टक्के डिजिटल असेल, अशी माहिती नक्वी यांनी दिली. या वेळी अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, हज समितीचे उपाध्यक्ष शेख जिना नबी आदी उपस्थित होते.
हज यात्रेवरील वाढीव ३ टक्के जीएसटी रद्द करण्याची शिफारस जीएसटी काउन्सिलला केल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यमंत्री कांबळे यांनी यात्रेवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली होती. हज अनुदानाची रक्कम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांवर खर्च करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. राज्य हज समितीचे माजी अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख यांनी हज यात्रेवरील जीएसटी पूर्णत: रद्द करण्याची मागणी केली. हज समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारत उभारण्याची मागणी त्यांनी केली.
यंदा हजची घोषणा लवकर केल्यामुळे निवास व्यवस्था, विमान व्यवस्थेसाठी जास्त वेळ मिळेल. हवाई प्रवासाची निविदा प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून निवास व्यवस्था जानेवारीपासून सुरू होईल. देशातील २१ विमानतळांवरून यात्रेकरू हजला जाणार आहेत.