मालमत्ताकर माफीची सेनेची घोषणा फसवी

By admin | Published: July 12, 2017 03:28 AM2017-07-12T03:28:39+5:302017-07-12T03:28:39+5:30

महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईप्रमाणे ठाण्यातही ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात १०० टक्के सवलत मिळणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली होती.

Declaration of the property tax fraud is fraudulent | मालमत्ताकर माफीची सेनेची घोषणा फसवी

मालमत्ताकर माफीची सेनेची घोषणा फसवी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईप्रमाणे ठाण्यातही ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात १०० टक्के सवलत मिळणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली होती. त्यानुसार मुंबईत त्याची अंमलबजावणीही अंतिम टप्यात आली आहे. परंतु, ठाण्यात मात्र अशा किती मालमत्ता आहेत, त्यांना सवलत दिली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, या आशयाचे साधे पत्रही सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला अद्याप न दिल्याने शिवसेनेने ठाणेकरांची घोर फसवणूक केल्याचा आरोप आता विरोधकांकडून होऊ लागला आहे. तर मुंबई आणि ठाण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ठाण्यात सत्ताधारी याची अंमलबजावणी करणार नाहीत. असा दावा करून मित्र पक्ष भाजपाने सेनेला थेट आव्हान दिले आहे.
महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेनेने मुंबई तसेच ठाण्यातील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ताकरात सवलत देण्याची घोषणा केली होती. मुंबईत घोषणा केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी शहरात अशा प्रकारच्या किती मालमत्ता आहेत, त्याचा किती बोजा पडणार याची सर्व माहिती मालमत्ताकर विभागाकडून घेऊन त्याचा सर्व्हे करण्यासंदर्भातील पत्र दिले होते. तसेच याबाबत प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन तो अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. दुसरीकडे अशा प्रकारच्या कोणत्याही सर्व्हेबाबत अद्यापही पत्र आलेले नाही. तसेच महापालिका अधिनियमात प्रशासनाला तसा प्रस्ताव तयार करण्याचे अधिकार नाहीत, असेही ठामपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बजेटच्या भाषणामध्येदेखील आम्ही ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात सवलत देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु, सत्ताधाऱ्यांकडून याबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. केवळ मतांसाठीच सत्ताधाऱ्यांनी ही घोषणा केली का काय? अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे.
- मिलिंद पाटील, विरोधी पक्षनेते - ठामपा
मुुंबई आणि ठाण्याची परिस्थिती फार वेगळी आहे. याचा अंदाज कदाचित सत्ताधाऱ्यांनाही आहे. त्यामुळे ते ठाण्यात असा ठराव करतील अशी शक्यता वाटत नाही. किंबहुना त्याचा उत्पन्नावरही परिणाम होणार असल्याने सत्ताधारी केवळ आश्वासनच देण्याचे काम करीत आहेत.
- मिलिंद पाटणकर, गटनेते, भाजपा
मुंबईला एक न्याय आणि ठाण्याला दुसरा हे आम्हाला मान्य नाही. ठाण्यातदेखील ५०० चौ. फुटांच्या घरांना सवलत मिळालीच पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी याचा विचार केला नाही तर मात्र मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल.
- अविनाश जाधव, शहर अध्यक्ष, मनसे
शिवसेनेने ठाण्याला दिलेला शब्द नेहमी पाळला आहे. त्यामुळे ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात सवलत मिळणारच, येत्या काही दिवसात तसा प्रस्ताव आम्ही सादर करू. - नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठामपा

Web Title: Declaration of the property tax fraud is fraudulent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.