दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; एकुण निकालाची टक्केवारी २२.८६
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 01:50 PM2019-08-30T13:50:27+5:302019-08-30T13:54:27+5:30
महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ३०) ऑनलाईन जाहीर करण्यात आला.
पुणे : महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ३०) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. एकुण निकालाची टक्केवारी २२.८६ इतकी असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालात ०.८० टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजता निकाल जाहीर झाला. मंडळामार्फत दि. १७ ते ३० जुलै या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. नऊ विभागीय मंडळामधून एकुण २ लाख ३४ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख २१ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ५० हजार ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकुण निकालामध्ये लातुर विभागाचा सर्वाधिक ३१.४९ टक्के तर मुंबई विभागाचा सर्वात कमी १४.४८ टक्के निकाल लागला आहे. एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या एकुण विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १८ हजार १६१ एवढी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र असतील, अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली. -------------
विभागनिहाय निकालाची टक्केवारी -
पुणे - १८.१२
नागपुर - ३०.८९
औरंगाबाद - २८.२५
मुंबई - १४.४८
कोल्हापूर - १५.१७
अमरावती - २९.५३
नाशिक - २५.०८
लातूर - ३१.४९
कोकण - १५.८१
निकालासाठी संकेतस्थळ - ६६६.ेंँ१ी२४ह्ण३.ल्ल्रू.्रल्ल