मराठा आरक्षणासाठी उपसमिती, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 05:12 AM2017-09-14T05:12:18+5:302017-09-14T05:12:55+5:30
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या समितीचे अध्यक्ष असतील.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या समितीचे अध्यक्ष असतील.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, हे भाजपाचे तर परिवहनमंत्री दिवाकर रावते व सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मंत्री या समितीचे सदस्य आहेत.
९ आॅगस्ट रोजी मुंबईत निघालेल्या मराठा महामोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर होणार आहे. हा अहवाल ठराविक कालावधीत तयार करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही असून उपसमिती यासंदर्भात मराठा समाज आणि सरकार यांमध्ये समन्वय साधणार आहे.
विनोद तावडे समितीत नाहीत
मराठा आरक्षणासंदर्भातील समितीचे अध्यक्षपद चंद्रकांत पाटील यांना देताना भाजपातील अन्य एक मराठा मंत्री विनोद तावडेंना सदस्यपददेखील देण्यात आलेले नाही.