15 डिसेंबरपूर्वी खड्डेमुक्तीचे आव्हान, 56000 किमी रस्त्यांवर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 03:23 AM2017-11-17T03:23:57+5:302017-11-17T03:24:59+5:30
राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असली तरी, खड्डेमुक्तीचे हे आव्हान सोपे नाही.
राजेश निस्ताने ।
यवतमाळ : राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असली तरी, खड्डेमुक्तीचे हे आव्हान सोपे नाही. सां.बा. खात्याच्या अखत्यारीत येणाºया ९० हजार किलोमीटर रस्त्यांपैकी तब्बल ५६ हजार किलोमीटर रस्त्यांवर खड्डे पडले असल्याची माहिती या खात्यानेच केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आहे.
रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांवरून विरोधकांनी सरकारला टिकेचे लक्ष्य केल्यानंतर सा.बां. मंत्री पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्य खड्डेमुक्त होईल, अशी घोषणा केली. जिल्हानिहाय बैठका घेऊन त्यांनी सगळी यंत्रणा कामाला लावली आहे. मंत्रालयात स्थापन केलेल्या वॉररुममधून खड्डेमुक्तीच्या मिशनवर लक्ष ठेवले जात आहे. हे करत असतानाच, ‘खड्डे पडले म्हणून आभाळ कोसळले का?’ असे वक्तव्य करून चंद्रकांतदादांनी विरोधकांच्या हाती आयते कोलित दिले. राष्टÑवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर ‘सेल्फी विथ खड्डे’ अशी मोहीम चालविली.
खड्डे बुजविण्यात मराठवाडा मागे-
सार्वजनिक बांधकाम खात्याने आतापर्यंत सर्वाधिक ३०.२२ टक्के खड्डे मुंबई परिमंडळात तर सर्वात कमी ७.९० टक्के खड्डे मराठवाड्यात अर्थात औरंगाबाद परिमंडळात बुजविले आहेत. पुणे २५.४३, नाशिक २७.३४, अमरावती १०.४८ तर नागपूर विभागातील २२.२२ टक्के खड्डे बुजविण्यात आले.
राज्यातील अर्ध्याहून अधिक रस्ते खड्ड्यांचेच आहेत..
राज्यातील ३७ हजार ७०० किलोमीटरचे राज्यमार्ग आणि ५२ हजार १७२ किलोमीटरचे प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ८९ हजार ८७२ किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली येतात. या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याची ओरड जनतेतून होत आहे. म्हणून बांधकाम खात्याने नेमके खड्डे कुठे व किती याचे सर्वेक्षण केले.
तेव्हा ८९ हजार किलोमीटर पैकी तब्बल ५६ हजार १६० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर खड्डे आढळून आले. तसा अहवाल बांधकाम मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये खड्डे असलेल्या राज्य मार्गांची लांबी २३ हजार ३७४ किलोमीटर तर प्रमुख जिल्हा मार्गांची लांबी ३२ हजार ७८६ किलोमीटर आहे.
अमरावती विभागाला हवे ६० कोटी -
अमरावती महसूल विभागात राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असे सुमारे १२ हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. यापैकी राज्य मार्गावर तीन हजार ११७ तर प्रमुख जिल्हा मार्गावर दोन हजार ९१६ किलोमीटर क्षेत्रात खड्डे आहेत. आतापर्यंत राज्य मार्गावरील ४६२ किलोमीटर अर्थात १४.८५ टक्के तर प्रमुख जिल्हा मार्गावरील १६९ किलोमीटर अर्थात ५.८२ टक्के खड्डे बुजविले गेले आहेत. अमरावती विभागात आतापर्यंत १०.४८ टक्के खड्डे बुजविले गेले आहे.त्यामध्ये अमरावती १४.८२, यवतमाळ ६०.१६, अकोला ११.७९, वाशिम ७.११ तर बुलडाणा जिल्ह्यातील १३.२२ टक्के खड्डे बुजविले गेले आहे. सहा हजार किमीवरील खड्डे बुजविण्यासाठी किमान ६० कोटी लागणार आहेत.