साखरेच्या उत्पादनात घट; वापरात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 04:54 AM2020-06-05T04:54:01+5:302020-06-05T04:54:18+5:30
गेल्या वर्षातील स्थिती : यंदा पुन्हा अतिरिक्त होण्याची शक्यता
चंद्रकांत कित्तुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जगभरातील साखर उत्पादनात २०१९-२०च्या हंगामात ७७ लाख ४२ हजार टनांनी घट होऊन ते १६६७ लाख ९८ हजार टन झाले आहे. २०१८-१९ मध्ये १७५४ लाख ४० हजार टन उत्पादन झाले होते. याउलट जगातील साखरेचा वापर मात्र २१ लाख ७६ हजार टनांनी वाढून तो १७६० लाख ९६ हजार टन झाला आहे. २०१८-१९ मध्ये तो १७३९ लाख २० हजार टन होता. नव्या साखर हंगामात मात्र साखरेच्या उत्पादनात १०० लाख टनापेक्षा जादा उत्पादन होणार असल्याने साखर अतिरिक्त होण्याची शक्यता आहे.
जगभरातील उत्पादन आणि वापर यातील तफावत पाहता २०१९-२० या वर्षात ९२ लाख ९८ हजार टन साखरेचा तुटवडा जाणवला आहे. यामुळेच गतवर्षी आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेचे दर १३ ते १४ सेंट प्रति पौंड (२४ ते २५ रुपये प्रतिकिलो) पर्यंत गेले होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून अतिरिक्त साखरेच्या समस्येला तोंड देणाऱ्या भारतालाही याचा फायदा झाला. भारताची साखर निर्यात ५० लाख टनाहून अधिक झाली आहे. भारतातही या हंगामात साखरेच्या उत्पादनात घट होऊन ते २७० लाख टन झाले आहे. साखरेची मागणी २० लाख टनांनी घटल्यामुळे या वर्षातील साखरेचा वापर २४० लाख टन इतकाच होण्याची शक्यता आहे. परिणामी एक आॅक्टोबरपासून सुरू होणाºया नव्या साखर हंगामाच्या प्रारंभी देशात ११५ लाख टन साखर शिल्लक असणार आहे. चालू वर्षी ब्राझीलने ऊस इथेनॉलकडून पुन्हा साखरेकडे वळविल्याने तेथील साखर उत्पादनात यंदा ७० लाख टनांनी वाढ होणार आहे.
ब्राझील पुन्हा अव्वल स्थान पटकावणार?
जगातील ११० देशांत साखरेचे उत्पादन होते. गतवर्षी ब्राझीलने ऊस इथेनॉलकडे वळविल्यामुळे भारत साखर उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर गेला होता. यंदा हे स्थान पुन्हा ब्राझील पटकाविण्याची शक्यता आहे. दहा प्रमुख साखर उत्पादक देशांपैकी भारत, ब्राझील, थायलंड, चीन, अमेरिका, मेक्सिको, रशिया, पाकिस्तान, फ्रान्स, आॅस्ट्रेलिया या देशांतच सुमारे ७० टक्के उत्पादन होते. आंतरराष्टÑीय साखर संघटनेचे हे आकडे आहेत.