वाचायचं... की गळक्या नळासारखं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2023 10:29 AM2023-08-13T10:29:51+5:302023-08-13T10:30:09+5:30

महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गाचं वाचनाच्या बाबतीत अगदी असंच झालं आहे.

declining reading culture and its consequences | वाचायचं... की गळक्या नळासारखं...

वाचायचं... की गळक्या नळासारखं...

googlenewsNext

आनंद अवधानी, मुक्त पत्रकार आणि लेखक

नुकताच माझ्या मित्राच्या मुलाच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग आहे. आम्ही सगळे एका पर्यटनस्थळी सहलीला गेलो होतो. तिथे सगळ्यांनी शीतपेयाच्या बाटल्या घेतल्या. माझ्या मित्राच्या शाळकरी मुलाच्या हातून ती बाटली निसटली आणि खळ्ळ असा आवाज करत फुटली. क्षणाचाही विलंब न लावता त्या छोट्या मुलाने दुकानदाराकडून दुसरी बाटली घेतली. या प्रकाराने माझा मित्र कमालीचा अस्वस्थ झाला. आपल्या मुलाला बाटली फुटल्याचं दुःख किंवा पश्चात्ताप क्षणभरही झाला नाही, याचा त्याला फार त्रास झाला.

महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गाचं वाचनाच्या बाबतीत अगदी असंच झालं आहे. गेली काही वर्षं मराठी (इंग्रजीसुद्धा) वाचन कमी होतं आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामागे पालकांचा बदललेला प्राधान्यक्रम हे महत्त्वाचं कारण आहे. महाराष्ट्रातल्या शहरी मध्यमवर्गाला सतत असं वाटतं की त्यांच्या मुलांना शाळेत भरपूर मार्क्स मिळावेत, तरच नावाजलेल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळतो, तरच भरपूर पगाराच्या पॅकेजची नोकरी मिळते. या भरपूर मार्क्स आणि भरपूर पगाराच्या पॅकेजच्या प्रवासामध्ये मराठी किंवा इंग्रजी वाचन ही स्टेशन्स लागतच नाहीत. त्यामुळे मुलं पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, विजय तेंडुलकर किंवा भालचंद्र नेमाडे वाचत नाहीत. त्याचप्रमाणे शेक्सपिअर, वर्डस्वर्थ, मिल्टन किंवा पामुक वाचत नाहीत. मुख्य म्हणजे आपली मुलं वाचत नाही, याची जराही खंत पालकांना वाटत नाही.

वाचन कमी होत आहे याची जाणीव काहीजणांना निश्चितपणे आहे. पण, वाचनाशी संपर्क तुटत चालल्याने आपलं समाज म्हणून किती मोठं नुकसान होतं आहे, याचं भान अजून आलेलं नाही. वाचनाच्या अभावामुळे मेंदूमधला ठहराव संपतो आहे. कोणत्याही एका विषयाचा खोलवर विचार करण्याची मेंदूची क्षमता हरवत चालली आहे. ज्या मुलांचा जन्म मोबाइल फोननंतर झाला आहे, त्यांना या सगळ्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. भविष्यात त्यांनी करिअर म्हणून काहीही केलं तरी एखादा विषय मुळातून समजून घेण्याची मेंदूची क्षमता शाबूत राहणं गरजेचं ठरणार आहे. आज अमेरिका आणि अन्य प्रगत देशांत मोबाइलचा वापर कामापुरताच करून पुस्तकांचं वाचन वाढवण्यावर भर दिला जात आहे. भारतात मात्र नेमकं उलटं चालू आहे. मुलांनी ‘ग्लोबल सिटिझन’ व्हावं, अशी त्यांच्या पालकांची इच्छा आहे. पण ‘ग्लोबल सिटिझन’ होण्यासाठी आपल्या मुलांना वैश्विक स्पर्धेत उतरावं लागणार आहे, याचा अंदाज अजून भारतीय पालकांना आलेला नाही. तो येईल तेव्हा ते वाचनाविषयी इतके उदासीन राहणार नाहीत. आपली मुलं आणि आपण स्वत: काही वाचत नाही, याची खंत वाटणं ही या सगळ्याची पहिली पायरी असेल.

- आज बहुतांश घरांमध्ये सकाळी उठल्यावर घरातला प्रत्येक जण आपापले मोबाइल फोन उघडतो. त्यावर रात्रीतून आलेले व्हॉट्सॲप, इन्स्ट्राग्राम आणि तत्सम निरोप वाचतो.

-  गळक्या नळातून अखंड पाणी गळत राहावं तसे त्यातले मेसेज, व्हिडीओ एकामागोमाग एक पाझरतात. बघता बघता घड्याळाचा काटा किती पुढे सरकला हे लक्षातच येत नाही. मग ऑफिसला जाण्याची घाई.

- ऑफिसात काम करताना मध्येमध्ये व्हॉट्सॲपच्या खिडकीत डोकावायचं, फेसबुकवर चक्कर मारायची. असं करत दिवस संपला तरी रात्रीही उशाशी फोन असतोच. या सगळ्यात वाचन येतच नाही. मासिक किंवा पुस्तक दूरची गोष्ट झाली. साधं वर्तमानपत्रही येत नाही. अर्थातच या मंडळींना त्याचा संकोचही वाटत नाही.


 

Web Title: declining reading culture and its consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.