चोपडा तालुक्यात कुपोषित बालकांच्या प्रमाणात घट; अमृत आहार योजनेचा सकारात्मक परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 08:40 AM2017-09-16T08:40:06+5:302017-09-16T08:42:38+5:30
चोपडा तालुक्यात आदिवासी गावांची संख्या लक्षणीय असली तरी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत मार्च २०१७ अखेर कुपोषित बालकांची संख्या कमी झाली आहे.
- संजय सोनवणे
जळगाव, दि. १६ - चोपडा तालुक्यात आदिवासी गावांची संख्या लक्षणीय असली तरी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत मार्च २०१७ अखेर कुपोषित बालकांची संख्या कमी झाली आहे. अमृत आहार योजनेची यशस्वी अंमलबजावणी आणि प्रशासकीय यंत्रणा, अंगणवाडी मुख्य सेविका, सेविका, मदतनीस यांच्या एकत्रित आणि सकारात्मक कार्याचे हे फळ आहे. पुढे असेच कार्य सातत्याने सुरू राहिल्यास तालुक्यातून कुपोषणाची समस्या हद्दपार होईल , यात शंका नसून तसा ‘आशेचा किरण’ दिसला आहे.
चोपडा येथील पंचायत समिती अंतर्गत बालविकास प्रकल्पाचे दोन कार्यालये आहेत. त्यात चोपडा १ (ग्रामीण) असून त्यात १३३ अंगणवाड्यांचा समावेश आहे. आणि दुसरे चोपडा २ (आदिवासी ) ज्यात एकूण १६८ अंगणवाड्यांचा समावेश आहे . दोन्ही केंद्रांसाठी स्वतंत्र बालविकास प्रकल्प अधिकारी नियुक्त आहेत. चोपडा एकसाठी एस. आर. गिंदेवार आणि चोपडा दोनसाठी राजेंद्र पाटील हे कार्यरत आहेत .
गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहता कुपोषणाचे प्रमाण दरवर्षी कमी कमी होत आले आहे . मार्च २०१३ अखेर दोन्ही केंद्रांतर्गत अनुक्रमे मध्यम, कमी वजनाच्या कुपोषित बालकांची संख्या १०९० आणि २५९३ तर मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या १२४ आणि ३१८ तर मार्च २०१४ अखेर मध्यम कमी वजनाच्या कुपोषित बालकांची संख्या ८१२ आणि २५९३ तर मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या १०० आणि २५८ अशी होती. मार्च २०१५ अखेर मध्यम कमी वजनाच्या कुपोषित बालकांची संख्या ८१५ आणि २५९३ तर मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या ९७ आणि २०३ अशी होती. मार्च २०१६ अखेर मध्यम कमी वजनाच्या कुपोषित बालकांची संख्या ९०७ आणि २२१८ तर मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या १६६ आणि १९६ एवढी होती . आणि मार्च २०१७ अखेर मध्यम कमी कमी वजनाच्या कुपोषित बालकांची संख्या ७८७ आणि २१०५ तर मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या १२१ आणि १९५ एवढी होती. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सध्या कुपोषित बालकांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे हे प्रशासकीय यंत्रणेचे यश म्हणावे लागेल.
कुपोषण रोखण्यासाठी शासनातर्फे आदिवासी भागासाठी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना दोन टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. प्रथम टप्पा गरोदर माता आणि स्तनदा मातांसाठी असतो. या टप्प्यात मातांना भाजी, पोळी, वरणभात हा आहार अंगणवाडी सेविकांमार्फत पुरविला जातो. हा आहार घेण्यासाठी गरोदर माता आणि स्तनदा माता अंगणवाडीत येत असतात. तर टप्पा दोनमध्ये शून्य ते सहा वर्षे वयातील सर्व बालकांना हप्त्यातून चार दिवस किंवा महिन्यातून सोळा दिवस एका दिवसाला प्रत्येकी दोन केळी आणि एक उकळलेले अंडे पुरवले जाते. या आहारातून कुपोषण थांबवण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणा व अंगणवाडी सेविका, मदतनिसांमार्फत केला जातो. तर शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर तीव्र कुपोषित बालकांसाठी बाल विकास ग्राम केंद्र आयोजित करून औषधी वाटप व आहार पुरवठा केला जातो. यासाठी एका महिन्यात एका लाभार्थ्यास बाराशे रुपये अनुदान प्राप्त होते. मार्च २०१७ अखेर सर्व्हेनुसार चोपडा तालुक्यात एकूण २८७४३ लाभार्थी असून त्यात मध्यम, कमी कुपोषित बालकांची संख्या ३६८३ आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या ४४२ एवढी आहे.