उत्पादन कमी तरीही कांद्याचे दर निम्यावर : गतवर्षीपेक्षा क्विंटलमागे १५०० रुपयांची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:51 AM2018-11-27T10:51:03+5:302018-11-27T10:53:24+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन कमी असूनही दर निम्यापेक्षा खाली आले आहेत. पावसाअभावी कांदा आकाराने लहान तयार झाल्याने त्याचा फटका दरावर झाला आहे.
-राजाराम लोंढे-
कोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन कमी असूनही दर निम्यापेक्षा खाली आले आहेत. पावसाअभावी कांदा आकाराने लहान तयार झाल्याने त्याचा फटका दरावर झाला आहे. क्विंटलमागे दीड हजार रुपयांची घसरण झाली असून कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.
नाशिक परिसरात कांद्याचे उत्पादन जास्त असल्याने सहाजिकच तेथील बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असते; पण कोल्हापुरातील उत्पादित किलोही कांदा बाजार समितीत न येता, राज्यातील दुसºया क्रमांकाची उलाढाल कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत होते. दरवर्षी सरासरी २५ लाख कांदा पिशव्यांची आवक बाजार समितीत होते. शंभर-सव्वाशे किलोमीटरची बाजारपेठ सोडून तीनशे-चारशे किलोमीटरवर माल येण्यामागे येथील बाजारातील पारदर्शकताच कारणीभूत आहे. राज्यातील इतर समित्यांच्या तुलनेत येथील दर नेहमीच चढे राहिले आहेत. पण यंदा कांद्याच्या दरात एकदमच घसरण झाल्याने शेतकºयांची अस्वस्थता वाढली आहे.
अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद या प्रमुख जिल्ह्यांत कांद्याचे रब्बी व खरीप हंगामात घेतात. सध्या बाजारात येत असलेला कांदा हा खरिपाचा आहे. यंदा पाऊस कमी झाला त्यात कांद्याला पोषक असे वातावरण नसल्याने बारीक कांदा तयार झाला. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ९३ हजार क्विंटल कांद्याची आवक राहिली पण दर प्रतिक्विंटल ५५०० रुपयांपर्यंत होता. यंदा ९० हजार क्विंटल आवक होऊनही ४०० ते २००० रुपयांपर्यंत दर राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रब्बी हंगामातील कांदाच चाळीत!
रब्बी हंगामातील कांद्याची लागवड नोव्हेंबरमध्ये केली जाते. त्यानंतर साडेतीन महिन्यांने तो कांदा बाजारात येतो. या कांद्यात पाण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने तो टिकाऊ असतो. त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा सहा-सात महिने चाळीत ठेवला तर तो अधिक मुरतो.
दोन महिन्यांने दर तेजीत
खरीप बरोबरच पाणीटंचाईमुळे यंदा कांद्याचे उत्पादन कमालीचे घटणार आहे. रब्बीचा कांदा चाळीत न ठेवता थेट शिवारातून बाजारात येणार आहे. त्यामुळे आता जरी कांद्याचे दर घसरले असले तरी दोन महिन्यांनी दर तेजीत राहतील, असा अंदाज आहे.
गेल्या चार वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील आवक व दरदाम-
महिना आवक क्विंटल किमान दर कमाल दर सरासरी दर प्रतिक्विंटल
नोव्हेंबर २०१५ १ लाख ४० हजार ४५५ ५०० ५५०० १९००
नोव्हेंबर २०१६ १ लाख १७ हजार ८३० १५० १५०० ७००
नोव्हेंबर २०१७ ९३ हजार ६५६ १००० ५५०० २५००
नोव्हेंबर २०१८ ९० हजार ३७८ ४०० २००० १०००
पावसामुळे कांदा बारीक तयार झाला हे जरी खरे असले तरी अपेक्षेपेक्षा जादा दर घसरल्याने अडचणीत आलो आहे. सध्या तीन ते चार रुपयांनी कांदा विकून घरी मोकळे गोणपाटच घेऊन जावे लागत आहे. किमान २५ ते ३० रुपये दर मिळाला पाहिजे.
- अरुण पवार (कांदा उत्पादक शेतकरी, मोहोळ)