ज्वारी, बाजरी, ऊस, कांद्याची घटणार उत्पादकता; तापमानवाढीमुळे शेतीवर गंभीर परिणामांची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 03:36 AM2021-03-22T03:36:23+5:302021-03-22T03:36:37+5:30

प्राध्यापक तोडमल यांच्या मते भविष्यातील तापमान वाढ ज्वारी, बाजरी आणि कडधान्य यासारख्या पारंपरिक पिकांबरोबरच ऊस, कांदा, मका यासारख्या नगदी पिकांच्या उत्पादकतेवरदेखील वाईट परिणाम करणार आहे.

Decreased productivity of sorghum, millet, sugarcane, onion; Possibility of serious effects on agriculture due to global warming | ज्वारी, बाजरी, ऊस, कांद्याची घटणार उत्पादकता; तापमानवाढीमुळे शेतीवर गंभीर परिणामांची शक्यता

ज्वारी, बाजरी, ऊस, कांद्याची घटणार उत्पादकता; तापमानवाढीमुळे शेतीवर गंभीर परिणामांची शक्यता

googlenewsNext

मुंबई : अतिपर्जन्यवृष्टी आणि तापमान वाढ यामुळे शेती संकटाच्या छायेत आहे. राज्यात उष्णतेची लाट, थंडीची लाट, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या वाढत्या घटनांमुळे अन्नधान्य उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहेत. राज्यातील हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे २०३३ नंतर ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, तांदूळ या सारख्या पिकांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतील. प्राध्यापक डॉ. राहुल तोडमल यांनी अभ्यासातून हे निरीक्षण नोंदवले आहे.

स्विझरलँडमधून जानेवारी २०१९मध्ये 'प्युअर अँड अप्लाइड जिओ फिजिक्स' या संशोधन मासिकात हवामान बदल आणि त्याचे कृषी क्षेत्रावर होणारे परिणाम या शीर्षकाने प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात २०५० पर्यंत ०.५ ते २.५ अंश सेल्सियसच्या दरम्यान वार्षिक सरासरी तापमानामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. २०३३ नंतर तापमानातील ही वाढ प्रकर्षाने जाणवणारी आहे. प्रादेशिकदृष्ट्या विचार करता कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत १ ते २.५ अंश सेल्सिअस इतकी तापमानात लक्षणीय वाढ होणार आहे.

हा निष्कर्ष विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती या ठिकाणी कार्यरत असणारे प्राध्यापक डॉ. राहुल तोडमल यांनी केलेल्या संशोधनातून मांडण्यात आला आहे. त्यानुसार पुढील पाच दशकांमध्ये जवळपास ८० टक्के जिल्ह्यांमध्ये वार्षिक सरासरी तापमान, वार्षिक किमान तापमान आणि वार्षिक कमाल तापमान यामध्ये लक्षणीय बदल झालेले असणार आहेत.

प्राध्यापक तोडमल यांच्या मते भविष्यातील तापमान वाढ ज्वारी, बाजरी आणि कडधान्य यासारख्या पारंपरिक पिकांबरोबरच ऊस, कांदा, मका यासारख्या नगदी पिकांच्या उत्पादकतेवरदेखील वाईट परिणाम करणार आहे. तसेच भविष्यातील उन्हाळे अधिक तीव्र असतील आणि हिवाळ्यातील थंडी कमी झालेली असेल. २०५० पर्यंत मोसमी पर्जन्यात सुमारे १८ ते २२ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये अनुभवलेल्या पूर परिस्थितीची पुनरावृत्ती राज्यभरात होईल.

सदर संशोधन महाराष्ट्र राज्यातील भविष्यातील तापमान आणि पर्जन्याचा आकृतिबंध सांगणारे असून त्यातून हे बदल मानवी अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या अन्न आणि पाणी या घटकांना प्रभावित करणार आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.  - नमन गुप्ता, हवामानविषयक माजी सल्लागार, महाराष्ट्र सरकार

Web Title: Decreased productivity of sorghum, millet, sugarcane, onion; Possibility of serious effects on agriculture due to global warming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.