देवेन भारती सहआयुक्तपदी
By admin | Published: April 14, 2015 02:27 AM2015-04-14T02:27:42+5:302015-04-14T02:27:42+5:30
२६/११ अतिरेकी हल्ल्याचा तपास करणारे देवेन भारती मुंबई पोलीस दलात परतले आहेत. त्यांना मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची (सहआयुक्त) जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रेल्वे आयुक्तपदी मधुकर पांडे : वाहतूक विभागाच्या सहआयुक्तपदी मिलिंद भारंबे
मुंबई : २६/११ अतिरेकी हल्ल्याचा तपास करणारे देवेन भारती मुंबई पोलीस दलात परतले आहेत. त्यांना मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची (सहआयुक्त) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईच्या दृष्टीने भारतींची बदली महत्त्वाची मानली जाते. याव्यतिरिक्त मुंबईच्या राज्य रेल्वे पोलीस आयुक्तपदी मधुकर पांडे यांना तर मुंबईच्या वाहतूक विभागाच्या सहआयुक्तपदी मिलिंद भारंबे यांना नियुक्त करण्यात आले आहे.
२६/११चा हल्ला घडला तेव्हा भारती मुंबई गुन्हे शाखेच्या अपर आयुक्त होते. तत्कालीन सहआयुक्त राकेश मारिया आणि भारती यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने या हल्ल्याचा यशस्वी तपास केला होता. गुन्हे शाखेत असताना भारती यांनी संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यात मारिया यांना मोलाची साथ दिली होती. पुढे त्यांच्यावर विशेष महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता त्यांच्यावर मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. भारती १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मधुकर पांडे यांची पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) या पदावरून राज्य रेल्वे पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
पांडे यांनी मुंबई पोलीस दलाच्या सुरक्षा व संरक्षण विभागाच्या अपर आयुक्तपदाची तसेच मध्य प्रादेशिक विभागाच्या अपर आयुक्तपदाची जबाबदारी हाताळली होती. याआधी रेल्वे आयुक्त असलेल्या रवींंद्र सिंगल यांची पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण)पदी बदली करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस आयुक्तपदाच्या कारकिर्दीत सिंगल यांनी गुन्हे रोखण्यासोबत महिलांच्या सुरक्षेवर अधिकाधिक भर दिला होता. त्यासाठी त्यांनी महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ वाढविले. निर्भया स्क्वॉड, निर्भया अॅप या नव्या व उपयुक्त योजना राबविल्या. मुंबईच्या वाहतूक शाखेच्या सहआयुक्तपदी नियुक्त झालेल्या मिलिंद भारंबे यांना पोलीस महानिरीक्षकपदी बढती दिली आहे. तर बी.के. उपाध्याय यांची सहआयुक्त (वाहतूक) या पदावरून गृहविभागाच्या प्रधान सचिव (विशेष) या पदी नियुक्ती केली आहे. उपाध्याय यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी ड्रंक अॅण्ड ड्रायव्हिंग मोहीम आक्रमकपणे राबवली. वाहतूक पोलिसांना प्रोत्साहन म्हणून
चांगली कामगिरी करणाऱ्यांना
दरमहा पारितोषिक देण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)
महत्त्वाच्या बदल्या - बढत्या
प्रवीण साळुंखे यांच्यावर राज्याच्या सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेची (महानिरीक्षक, कोस्टल सिक्युरीटी) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागासह मुंबई मध्य प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईत अपर आयुक्त असताना महालक्ष्मीच्या शक्ती मिल बलात्कार प्रकरणाच्या तपासात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
नांगरे पाटील यांना बढती
२६/११ हल्ल्यात ताजमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांचा मुकाबला करणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांना विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. हल्ल्याच्या वेळी नांगरे-पाटील परिमंडळ-१चे उपायुक्त होते. तेथून त्यांना पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर आुयक्त करण्यात आले. सध्या ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात उपमहानिरीक्षक होते. बढतीनंतर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा
कंसात आधीचे पद दिले आहे
१. सतीशचंद्र माथूर - महासंचालक विधी तांत्रिक (पोलीस आयुक्त पुणे), २. एस.पी. यादव - पोलीस आयुक्त नागपूर (अतिरिक्त महासंचालक सीआयडी), ३. ए.के. पठाण - पोलीस आयुक्त पुणे (पोलीस आयुक्त नागपूर), ४. व्ही.डी. मिश्रा - अतिरिक्त पोलीस महासंचालक आस्थापना (अति. पोलीस महासंचालक पीसीआर),
५. डी. कनकरत्नम् - अतिरिक्त महासंचालक रेल्वे (अति. पोलीस महासंचालक आस्थापना), ६. संजय बर्वे - अतिरिक्त महासंचालक एसीबी (अति. महासंचालक रेल्वे), ७. संदीप बिष्णोई - अतिरिक्त महासंचालक एसआरपीएफ (मुख्य दक्षता अधिकारी, एसटी महामंडळ), ८. विनीत अगरवाल - मुख्य दक्षता अधिकारी एसटी महामंडळ (विशेष सचिव गृह), ९. विवेक फणसाळकर - अतिरिक्त महासंचालक एटीएस (सहआयुक्त प्रशासन), १०. हिमांशू रॉय - अतिरिक्त महासंचालक पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ (अतिरिक्त महासंचालक एटीएस), ११. भूषणकुमार उपाध्याय - प्रधान सचिव विशेष गृह (सहआयुक्त वाहतूक), १२. संजयकुमार - अतिरिक्त महासंचालक सीआयडी (सहआयुक्त पुणे), १३. राजेंद सिंह - अतिरिक्त महासंचालक नियोजन व समन्वय (आयुक्त औरंगाबाद) १४. हेमंत नगराळे - अतिरिक्त महासंचालक म्हाडा (अति. महासंचालक नियोजन व समन्वय), १५. प्रज्ञा सरवदे - अतिरिक्त महासंचालक आणि दक्षता अधिकारी सिडको (विशेष उपमहानिरीक्षक, सीव्हीओ सिडको), १६. विठ्ठल जाधव - उपमहानिरीक्षक (तुरुंग) नागपूर (संचालक प्रशासन राज्य सुरक्षा महामंडळ), १७. शशिकांत शिंदे - संचालक प्रशासन राज्य सुरक्षा महामंडळ (उपमहानिरीक्षक तुरुंग; नागपूर), १८. मधुकर पांडे - आयुक्त रेल्वे (विशेष महानिरीक्षक प्रशिक्षण), १९. रवींद्र सिंघल - विशेष महानिरीक्षक प्रशिक्षण (आयुक्त रेल्वे), २०. कुलवंतकुमार सरंगळ - विशेष महानिरीक्षक तरतुदी (प्रतीक्षेत), २१. प्रभातकुमार - विशेष महानिरीक्षक कायदे व सुव्यवस्था (विशेष महानिरीक्षक तरतुदी), २२. देवेन भारती - सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था; मुंबई (विशेष महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था), २३. धनंजय कमलाकर - सहआयुक्त आर्थिक गुन्हे शाखा; मुंबई (सहआयुक्त कायदा, सुव्यवस्था), २४. राजवर्धन - सहआयुक्त नागपूर (अतिरिक्त आयुक्त आर्थिक गुन्हे), २५. मिलिंद भारंबे - सहआयुक्त वाहतूक; मुंबई (अतिरिक्त आयुक्त पश्चिम रेल्वे), २६. विश्वास नांगरे पाटील - विशेष महानिरीक्षक म्हणून पदोन्नती (पोलीस उपमहानिरीक्षक एसीबी), २७. सुरेश मेकला - विशेष महानिरीक्षक एसआरपीएफ पुणे (पोलीस आयुक्त अमरावती), २८. अनुपकुमारसिंह - सहआयुक्त प्रशासन मुंबई (सहआयुक्त नागपूर), २९. सुनील रामानंद - सहआयुक्त पुणे (विशेष महानिरीक्षक एसआरपीएफ पुणे), ३०. रितेशकुमार - विशेष महानिरीक्षक सीआयडी पुणे (विशेष महानिरीक्षक कोल्हापूर).
३१. संजय वर्मा - विशेष महानिरीक्षक कोल्हापूर (प्रतीक्षेत), ३२. जयजितसिंग - विशेष महानिरीक्षक नाशिक (विशेष महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा), ३३. प्रवीण साळुंखे - विशेष महानिरीक्षक सागरी सुरक्षा (विशेष महानिरीक्षक नाशिक), ३४. प्रशांत बुरुडे - विशेष महानिरीक्षक कोकण (विशेष महानिरीक्षक सागरी सुरक्षा),
३५. अमिताभ गुप्ता - विशेष महानिरीक्षक-व्हीआयपी सुरक्षा (विशेष महानिरीक्षक कोकण), ३६. बिपीनकुमारसिंह - विशेष महानिरीक्षक नांदेड (विशेष महानिरीक्षक तुरुंग), ३७. दीपक पांडे - पोलीस उपहानिरीक्षक-मानवाधिकार; मुंबई (अतिरिक्त पोलीस आयुक्त; गुन्हे नागपूर)