दीनदयाळ रोडवासींचाही रुंदीकरणाला विरोध!

By admin | Published: November 2, 2016 03:28 AM2016-11-02T03:28:12+5:302016-11-02T03:28:12+5:30

पूर्वेतील केळकर रोडवरील रहिवासी आणि व्यापाऱ्यांपाठोपाठ आता पश्चिमेतील पं. दिनदयाळ रोडवासीयांनाही रस्तारुंदीकरणाला विरोध केला

Deendayal road residents protest against widening! | दीनदयाळ रोडवासींचाही रुंदीकरणाला विरोध!

दीनदयाळ रोडवासींचाही रुंदीकरणाला विरोध!

Next


डोंबिवली : पूर्वेतील केळकर रोडवरील रहिवासी आणि व्यापाऱ्यांपाठोपाठ आता पश्चिमेतील पं. दिनदयाळ रोडवासीयांनाही रस्तारुंदीकरणाला विरोध केला आहे. या कारवाईविरोधात तेथील रहिवाशांनी नुकतीच स्वाक्षरी मोहीम राबवली. शहरविकासाच्या नावाखाली रहिवाशांना रस्त्यावर आणू पाहणाऱ्या केडीएमसी प्रशासनाचा आम्ही
निषेध करीत आहोत. आम्हाला विश्वासात न घेता राबवली जाणारी मोहीम चुकीची आहे, असे मत पं. दिनदयाळ मार्ग रहिवाशी संघर्ष समितीने मांडले आहे.
पश्चिमेतील द्वारका हॉटेल ते रेतीबंदर रोड हा पंडित दिनदयाळ मार्ग आहे. केडीएमसीने हाती घेतलेल्या रस्तारुंदीकरण मोहिमेत या
रस्त्याचाही समावेश आहे. रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयाने या मार्गावरील अनेक निवासी बांधकामांना
नोटिसा बजावल्या आहेत. त्यात १८ इमारती व १४ बंगले आहेत. त्यामुळे ४८८ कुटुंबे व ८५ दुकाने असे अंदाजे तीन हजार नागरिक विस्थापित होतील, असा दावा रहिवाशी संघर्ष समितीचा आहे.
१९९५-९६ मध्ये याच रस्त्याचे रुंदीकरण झाले होते. त्यावेळी बाधित झालेले रहिवाशी आणि व्यापारी यांना अद्यापपर्यंत कोणताही मोबदला मिळालेला नाही. विशेष म्हणजे २०१२ मध्ये एका स्थानिक नागरिकाने कारवाईविरोधात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात केडीएमसीविरोधात दाखल केलेल्या दाव्यावर झालेल्या सुनावणीत या रस्त्याचे काम विकास आराखड्यानुसार पूर्ण झाले आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानंतरही पुन्हा त्याच मार्गावर रस्तारुंदीकरणाचा घाट घातला जात आहे, याकडे रहिवाशी संघर्ष समितीने लक्ष वेधले आहे. प्रभाग कार्यालयाकडून संबंधितांना नोटिसा बजावण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. जबरदस्तीने अन्यायकारक पद्धतीने रुंदीकरण रेटून नेण्याचा केडीएमसीचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. पूर्वेतील केळकर रोडवरील रहिवासी आणि दुकानदारांनी रस्ता रुंदीकरणाला विरोध केला आहे. त्यांच्यापाठोपाठ आता दिनदयाळ रोडवरील रहिवाशी आणि व्यापाऱ्यांनी कारवाईला तीव्र विरोध दर्शवल्याने ही मोहीम बारगळण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे रहिवाशांचे लक्ष आहे.
>‘त्या’ बैठकीचे
काय झाले?
दिनदयाळ मार्गावरील रस्तारुंदीकरणात आनंदनगर प्रभागातील बांधकामेही बाधित होत आहेत. स्थानिक नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी बाधितांची विशेष बैठक बुधवार २६ आॅक्टोबरला बोलावली होती. महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात ही बैठक होणार होती.
याबाबत संबंधितांना पत्रव्यवहारही करण्यात आले होते. परंतु, बैठक झाली नाही. याचे कारण गुलदस्त्यात असताना आता बाधित थेट आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेणार आहेत.

Web Title: Deendayal road residents protest against widening!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.