उंड्रीमध्ये तीव्र पाणीटंचाई
By Admin | Published: June 11, 2016 01:00 AM2016-06-11T01:00:01+5:302016-06-11T01:00:01+5:30
पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा नावापुरता होत असल्यामुळे उंड्री गावात तीव्र पाणीटंचाई काही महिन्यांपासून निर्माण झाली
उंड्री : पुणे पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा नावापुरता होत असल्यामुळे उंड्री गावात तीव्र पाणीटंचाई काही महिन्यांपासून निर्माण झाली आहे. महापालिकेच्या हद्दीस लागून असलेले व अंशत: महापालिकेत समाविष्ट झालेल्या उंड्री ग्रामपंचायतीस महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो. परंतु काही महिन्यांपासून होणारा पाणीपुरवठा जवळपास बंद झाल्यामुळे ग्रामपंचायतीस पाणीपुरवठा करणे प्रचंड अवघड व खर्चिक होत आहे.
उंड्रीमधील मोठमोठे गृहप्रकल्प व या भागात असणाऱ्या नावाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा यामुळे येथील नागरीकरण वेगाने होत आहे. गेल्या काही वर्षात लोकसंख्या दुपटीपेक्षा जास्तीने वाढली आहे. ग्रामपंचायतीने गावात पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वत्र नळजोड दिले आहेत. पालिकेकडून ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा होत असलेल्या पाईपलाईनलाच पालिका हद्दीतच मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोड घेतल्यामुळे पाणीपुरवठा अल्पप्रमाणात होतो. या अनधिकृत नळजोडावर कसलीही कारवाई होत नाही.
ग्रामपंचायतीने स्वबळावर लाखो रुपये खर्च करून सुरळीत पाणीपुरवठा होईल अशी केलेली व्यवस्था यामुळे निकामी ठरत आहे, असे माजी उपसरपंच सचिन घुले म्हणाले. महानगरपालिकेने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे उपसरपंच वसंत कड, निवृत्ती बांदल, सुरेखा कड, प्रवीण आबनावे, मोहन कामठे यांनी सांगितले.
(वार्ताहर)
>टँकरने होतोय पाणीपुरवठा
४उंड्री गाव व महापालिकेच्या सीमेजवळून महंमदवाडीत पालिकेची पाण्याची लाईन गेलेली आहे. त्यातून किंवा खडी मशीन चौक येथील पाण्याच्या लाईनमधून पाणी घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेकडे करत आहोत. परंतु त्यास महापलिकेकडून प्रतिसाद मिळत नाही व पाणीटंचाईमुळे ग्रामपंचायतीस टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून, त्याकरिता लाखो रुपये महिन्याकाठी खर्च करावे लागत आहेत, असे उंड्रीच्या सरपंच श्वेता घुले यांनी सांगितले.