पिरवपैकी डुबलवाडीत तीव्र पाणीटंचाई

By admin | Published: May 6, 2014 07:09 PM2014-05-06T19:09:25+5:302014-05-06T20:49:58+5:30

नळ योजनेचे वीज बिल थकीत, नैसर्गिक पाण्याचा स्रोत कमी झाल्याने गैरसोय

Deep water shortage in Duvalwadi | पिरवपैकी डुबलवाडीत तीव्र पाणीटंचाई

पिरवपैकी डुबलवाडीत तीव्र पाणीटंचाई

Next
योजनेचे वीज बिल थकीत, नैसर्गिक पाण्याचा स्रोत कमी झाल्याने गैरसोय
टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

राधानगरी : नदीवरील नळ योजनेचे वीज बिल थकल्याने ती बंद, तर नैसर्गिक पाण्याचा स्रोत कमी झाल्याने ती कुचकामी अशी स्थिती झाल्याने राधानगरी तालुक्यातील पिरळपैकी डुबलवाडी येथे तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. पिण्यासाठी पाणी मिळविणेही मुश्कील होत आहे. येथे टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधितांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथून जवळच असलेल्या पिरळ ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या कामेवाडी व डुबलवाडी या प्रत्येकी तीस-चाळीस घरांच्या दोन-अडीचशे वस्तीच्या दोन स्वतंत्र वाड्या आहेत. उंच डोंगरावर दुर्गमानवाडच्या कड्याजवळ असलेल्या वाड्या मूळ गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर वसलेल्या आहेत. पावसाचे प्रमाण प्रचंड असले तरी डोंगर उतार असल्याने पाणी साचून राहत नाही. परिणामी उन्हाळ्यातील काही महिने पाण्यासाठी वणवण करणे हा येथील लोकांच्या जीवनाचा एक भागच बनला आहे.
१९९६ मध्ये पिरळ येथे सुमारे पाऊणकोटी खर्चाची भोगावती नदीवरील नळपाणी योजना करण्यात आली. गावाशेजारी टेकडीवर साठवण टाकी बांधून त्यात नदीतील पाणी सोडण्यात आले. येथून पिरळ, सावर्धन, चौगलेवाडी येथून पाणी पुरविले जात आहे. याचवेळी डुबलवाडी व कामेवाडीसाठी याच टाकीतून पाणी उपसा करून पूरक नळयोजना केली. यासाठी दहा अश्वशक्तीचा मोटर पंप बसविण्यात आला. काही वर्षे ही योजना सुरू राहिली, पण विजेचे बिल युनिटवर आकारणी सुरू झाल्यावर हा अंगापेक्षा भोंगा मोठा अशी स्थिती झाली. लोकवस्तीच्या मानाने होणारे प्रचंड वीज बिल भरणे आवाक्याबाहेर गेल्याने ग्रामपंचायतीने ही पूरक योजनाच बंद केली. सध्या येथे आठ-दहा लाख वीज बिल थकीत असल्याचे समजते.
दोन वर्षांपूर्वी पेयजल योजनेतून या दोन वाड्यासाठी नैसर्गिक झर्‍यापासून पाणी पुरविणारी नळयोजना करण्यात आली. यासाठी ६९ लाख रुपये खर्च करण्यात आले. यासाठी दुर्गमानवाड डोंगरातून दोन-अडीच किमी अंतरावरून पाईपद्वारे प्रथम कामेवाडी व तेथून डुबलवाडी येथे पाणी आणण्यात आले. पावसाळ्यापासून आठ महिने यातून पुरेसा पाणीपुरवठा होतो, पण उन्हाळा सुरू झाल्यावर पाणी कमी होते. सध्या मिळणारे पाणी कामेवाडी येथील लोकांना कसे तरी पुरते. त्यापुढे ते येतच नाही. परिणामी डुबलवाडीत गेल्या दोन महिन्यांपासून पाणी मिळालेले नाही. यामुळे येथील लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. येथील एका खासगी विहिरीचा लोकांना आधार होता, पण तेथेही आता पाणी कमी झाले आहे.
वीस वर्षांत दोन पाणी योजनावर दीड कोटीचा निधी खर्च होऊनही या दोन वाड्याना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामस्थांनी तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी किरण गौतम यांना याबाबत निवेदन दिले आहे. टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.
प्रतिनिधी

प्रतिक्रिया
या वाड्यातील पाणीप˜ी व वीज बिल यामध्ये मोठा फरक आहे. ग्रामपंचायतीलाही ही रक्कम भरणे पेलणार नाही. त्यामुळे जुनी योजना बंद आहे. नव्या योजनेत पाण्याचा स्रोत कमी झाल्याने अडचण आहे.
सिंधुताई अशोक पाटील, सरपंच ग्रा. पं. पिरळ
-----

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार पाहणी करण्यात आली. दुर्गमानवाड येथील एका खासगी क्षेत्रातील नैसर्गिक झर्‍याचे पाणी शेतीसाठी वापरण्यात येते. यातील पाणी पिकासाठी अधिगृहीत करण्याबाबत तहसीलदार यांच्या आदेशाने कारवाई करण्यात येईल.
किरण गौतम, गटविकास अधिकारी.

Web Title: Deep water shortage in Duvalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.