बदलापूरातील 'त्या' शाळेवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई; मंत्री दीपक केसरकरांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 05:02 PM2024-08-21T17:02:00+5:302024-08-21T17:16:08+5:30
बदलापूर अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण राज्यात संताप उसळला आहे. त्यात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
मुंबई - बदलापूरातील आदर्श विद्या मंदिरात झालेला प्रकार हा अतिशय घृणास्पद होता. या प्रकारात झालेली दिरंगाई अक्षम्य होती. शिक्षण उपसंचालकाला चौकशीचे आदेश दिले होते. तो अहवाल आमच्याकडे आला असून आमच्या विभागाच्या संचालकांनी या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. शिक्षण विभागाने जी कारवाई करायची होती ती पूर्ण झालेली आहे. उद्यापासून या शाळेचा ताबा प्रशासक घेतील अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली.
मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात असे प्रकार घडू नये यासाठी आजच वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबाबत आढावा घेतला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्ती करताना खबरदारी, तक्रार पेटी, सखी सावित्री समितीच्या तरतुदीचं पालन, विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना करणे. अशी प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, समिती सदस्य यांच्यावरही कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय महाराष्ट्रात कडक अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. शिक्षण विभागाने जी कारवाई करायची होती ती पूर्ण झालेली आहे. उद्यापासून या शाळेचा ताबा प्रशासक घेतील. स्थानिक अधिकारी तिथे प्रशासक असतील. संस्थेला अपील करायचे असेल तर त्यांना उत्तर देण्याची मुभा आहे. विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी शिक्षण विभाग घेतंय. कुठल्याही संस्थेवर प्रशासक लागू होणे ही मोठी शिक्षा असते. सखी सावित्री हा मुलांच्या सुरक्षेचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून मुलांची छळवणूक न होता शिक्षणाचा दर्जा कसा वाढवला जाईल याचे सविस्तर वर्णन या योजनेत आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षण खात्याची असल्याने सर्व शिक्षण संचालक, उपसंचालक, अधिकारी यांना यात कुठलीही कमतरता येणार नाही याचे आदेश दिले आहेत असंही केसरकर म्हणाले.
दरम्यान, हा प्रकार करणारे लोक मानसिक विकृतीचे असतात. ही विकृती ठेचली पाहिजे. आपण कितीही सुरक्षा ठेवली तरी अशी विकृत माणसं समाजात आहेत त्यांना कठोर शिक्षा होणं गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने फास्टट्रॅक कोर्ट, शक्ती कायदा लवकरात लवकर आणणं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. १२ हजार मुले आज त्या शाळेत शिकतात. त्याठिकाणी सातत्याने मोर्चे आणायचे. त्या मुलांनाही शिकण्याचा अधिकार आहे. ही कुठली निती आहे?, आरोपीला पकडलं आहे. त्यावर कारवाई सुरू आहे. मात्र शाळा व्यवस्थित सुरू झाली पाहिजे त्यासाठी आजूबाजूला शांतता हवी. आज त्याठिकाणी आंदोलन करणारे हे राजकीय लोक आहेत ते बाहेरून येतायेत हेही लक्षात घेतले पाहिजे. हे प्रकरण पेटत ठेवून त्यातून राजकीय लाभ घेण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर ते विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही असं सांगत दीपक केसरकरांनी विरोधकांवर निशाणा साधला.