Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे पराभूत होतील याची भीती होती, म्हणून सचिन अहिरांना शिवसेनेत घेण्यात आले”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 03:25 PM2023-02-09T15:25:13+5:302023-02-09T15:27:38+5:30
Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंना निवडणुकीला उभे केले. तेव्हा ते विरोधकांना घाबरले, असा पलटवार शिंदे गटाकडून करण्यात आला.
Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिकच तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे एकामागून एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हाने देत आहेत. तसेच शिंदे गटावर सडकून टीकाही करताना दिसत आहेत. शिंदे गटही ठाकरे गटाच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेत पलटवार करत आहे. यातच आदित्य ठाकरे पराभूत होतील म्हणून शिवसेना विरोधकांना घाबरली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा विजय सोपा व्हावा म्हणून सचिन अहिर यांना शिवसेनेत घेण्यात आले, असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी काही खुलासे करत ठाकरे गटावर पलटवार केला आहे. तरुणाला कोणीही घाबरत नाही. एक तर आदित्य ठाकरे यांना निवडणुकीला उभे केले. तेव्हा ते विरोधकांना घाबरले. सचिन अहिर यांना विनंती करून आपल्या पक्षात घेतले. त्यानंतर उमेदवारी भरू नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला. त्यानंतर त्यांना आमदार केले. हा सर्व इतिहास आहे. पडताळून पाहा, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.
जे नेते लोकांचा आशीर्वाद घेऊन विजयी होतात, त्यांच्यावर बोट दाखवू नका
एका मतदारसंघासाठी दोन एमएलसी करायच्या तर आपली आमदार संख्या २८८ आहे. ती ५६० करावी लागेल. एका आमदारापाठी दोन एमएलसी असे करून लोक जिंकत असतील तर लोकशाहीचा ढाचाच कोसळेल. हे करणारे आदित्य ठाकरे आहेत. दुसरे तिसरे कोणी नाही. त्यांच्यासाठी दोनच काय चार एमएलसी करा. आम्हाला काही म्हणायचे नाही. तो त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. पण जे नेते लोकांचा आशीर्वाद घेऊन विजयी होतात. त्यांच्यावर बोट दाखवू नका, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली.
आमचा वाद उद्धव ठाकरे यांच्याशी नव्हताच
आमचा वाद उद्धव ठाकरे यांच्याशी नव्हताच. महाविकास आघाडीसोबतची युती तोडावी आणि भाजपसोबत युती करावी हेच आमचे म्हणणे होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडतो म्हणून सांगा आम्ही सर्वच्या सर्व मुंबईला येतो, असे आम्ही तेव्हा वारंवार म्हणत होतो. आम्ही गद्दारी केली नाही. आम्ही पक्ष सोडला नाही. उलट आम्हीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडण्याची मागणी करत होतो, असे दीपक केसरकरांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"