Deepak Kesarkar: केसरकरांच्या स्वागतास खुद्द शिंदे, गुरुवारी पहाटेच गुवाहाटीत, भाजपसोबत जाण्याची होती भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 08:35 AM2022-06-24T08:35:24+5:302022-06-24T08:36:20+5:30
Deepak Kesarkar: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपद मिळाले नसल्याने नाराज झालेले शिवसेनेचे सावंतवाडी मतदार संघातील आमदार दीपक केसरकर यांनी अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाला साथ दिली.
सावंतवाडी : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपद मिळाले नसल्याने नाराज झालेले शिवसेनेचे सावंतवाडी मतदार संघातील आमदार दीपक केसरकर यांनी अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाला साथ दिली. गुरुवारी पहाटे ते फुटीर आमदारांचे वास्तव्य असलेल्या आसामच्या गुवाहाटीला पोहोचले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी खुद्द एकनाथ शिंदे खोलीबाहेर आले. शिवसेना व भाजप एकत्र यावेत यासाठी ते सतत प्रयत्न करत होते.
केसरकर हे भाजप-शिवसेना युतीच्या काळात अर्थराज्यमंत्री होते. मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर केसरकर यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आले. त्यामुळे त्यांच्या मनात रोष होता.
शिवसैनिकांनी केसरकरांचा केला पाठलाग
मंगळवारी रात्री शिवसेना आमदारांचा मुक्काम असलेल्या मुंबईतील हाॅटेलच्या गेटवरून ते माघारी फिरल्यानंतर तेथेच त्यांना शिवसैनिकांनी अडवले होते. त्यावरून त्यांच्यात व शिवसैनिकांत हमरीतुमरी झाली होती, तर ते ज्या दादर येथील इमारतीमध्ये राहतात, तिथंपर्यंत त्यांच्या मागावर शिवसैनिक लावले होते. या सर्व प्रकारानंतर केसरकर हे संतप्त बनले. त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली होती. हा प्रकार घडल्यानंतर ते नाराजच होते.