पाचही जणांविरोधात सक्षम पुरावे सर्वोच्च न्यायालयात मांडणार- दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 07:58 PM2018-08-31T19:58:57+5:302018-08-31T19:59:19+5:30
बंदी घातलेल्या माओवाद्यांशी संपर्क ठेवल्याच्या कारणातून ज्यांना अटक झाली आहे
सावंतवाडी : बंदी घातलेल्या माओवाद्यांशी संपर्क ठेवल्याच्या कारणातून ज्यांना अटक झाली आहे, त्यांच्या विरोधात पोलिसांकडे सक्षम असा पुरावा आहे. तो आम्ही सर्वोच्च न्यायालयात मांडू, असा विश्वास राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. विचारवंतांच्या झालेल्या हत्यांचे प्रकरण महाराष्ट्र पोलिसांनीच उघडकीस आणल्याचा दावाही केसरकर यांनी यावेळी केला.
शुक्रवारी एका कार्यक्रमानिमित्त मंत्री केसरकर हे सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित युवक ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्या चौकशीतून वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. पोलीस त्यांचा तपास करीत असून, त्यांचे लक्ष राज्यातील अन्य कोणत्या व्यक्ती मारण्याचा असेल, तशी नावे पुढे आली असतील, तर त्यांना पूर्णपणे पोलीस संरक्षण दिले जाईल, असे सांगितले. तसेच काहींना यापूर्वी संरक्षण दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हिंदुत्व संघटनांशी संबंधित युवकांना पकडल्यानंतर लागलीच पुणे पोलिसांनी काही विचारवंतांना पकडले आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना पकडल्याची चर्चा थांबविण्यासाठी अशी कारवाई केली म्हणणे योग्य नाही. तुम्ही कधीही चर्चा करू शकता. हे व्यक्तिस्वातंत्र्य आहे, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. कर्नाटक पोलिसांमुळेच डॉ. दाभोलकर तसेच गोविंद पानसरे यांचे मारेकरी मिळाले का, यावर मंत्री केसरकर यांनी खुलासा केला आहे. महाराष्ट्र पोलिसांची यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळेच हा तपास लागला आहे. स्फोटांची माहिती कर्नाटक पोलिसांची नव्हती, तर महाराष्ट्र पोलिसांनीच ही सर्व लिंक शोधून काढली आहे. त्यामुळे राज्यातील पोलिसांचे कौतुक केलेच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे पुणे प्रकरणात ज्या कॉम्रेडांना पकडले त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यावर मंत्री केसरकर यांनी प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. कोणी कोणाला भेटावे याच्या तपासावर कोणताही परिणाम होणार नाही. पोलीस आपले काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. जर कोण बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंध ठेवत असेल तर पोलिसांनी केलेली ही कारवाई योग्यच आहे, असेही मंत्री केसरकर यावेळी म्हणाले.
सावंतवाडीतील प्राध्यापकाने संरक्षण मागितल्यास देणार
सावंतवाडीतील प्राध्यापकाचे नाव हे काही हिंदुत्ववादी संघटनांच्या निशाण्यावर होते. या वृत्ताला मंत्री केसरकर यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल आणि कोणाला सोबत नसेल. तर त्याच्यावर पोलीस नजर ठेवतील, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.