Bacchu Kadu : बच्चू कडूंना मंत्रिपद मिळणार का?; नाराजीवर दीपक केसरकर स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 11:10 AM2022-08-11T11:10:49+5:302022-08-11T11:22:06+5:30
Deepak Kesarkar And Bacchu Kadu : कॅबिनेट मंत्रिपदे ही शिवसेना आणि भाजपामध्ये देण्यात आली. यामुळे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू नाराज झाले आहेत. प्रसारमाध्यमांसमोर आपली उघड नाराजी व्यक्त केली.
मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी करण्यात आला. परंतू यामध्ये अपक्ष आमदारांना स्थान देण्यात आले नाही. कॅबिनेट मंत्रिपदे ही शिवसेना आणि भाजपामध्ये देण्यात आली. यामुळे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू नाराज झाले आहेत. प्रसारमाध्यमांसमोर आपली उघड नाराजी व्यक्त केली. शिंदे सरकारमध्ये सामाजिक न्याय, अपंग कल्याण आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद मिळायला हवं, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. यानंतर आता दीपक केसरकर यांनी बच्चू कडू नाराज असल्याच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे.
बच्चू कडूंना (Bacchu Kadu) अतिशय चांगलं खातं मिळालेलं दिसेल, लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी "बच्चू कडू आमचे जवळचे नेते आहे. आमच्या मित्रपक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा योग्य तो मान महाराष्ट्रात ठेवला जाईल. लवकरच आम्ही सर्वजण जाऊन त्यांची भेट घेऊ. त्यांना अतिशय चांगलं खातं हे विस्तारानंतर मिळालेलं तुम्हाला दिसेल" असं म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाराज आहात का? असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी नाराजी आहे, पण एवढीही नाही की दुसरीकडे जाऊ. ही क्षणीक नाराजी आहे. सर्वच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर वेगळी गोष्ट असती. काही मुद्द्यांना घेऊन आम्ही शिदेंना पाठिंबा दिला होता. त्यांनी काही सांगितलेले म्हणून आम्ही मागितले. शिंदेंनी मंत्रिपद देण्याचे आम्हाला आश्वासन दिले होते. मंत्री बनवितो म्हणालेले, तर बनवायला हवे होते. परंतू पहिल्या विस्तारात मिळाले नाही. पहिल्या नाही निदान शेवटच्या तरी देतील. नाही दिले तर विचार करू, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली.
हे राजकारण आहे. यात दोन आणि दोन चार होत नाही, शून्यही होऊ शकतो. अडीच वर्षांनीदेखील मंत्रिमडळ विस्तार होऊ शकतो. काहीही सांगू शकत नाही, असे कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे समर्थक अपक्ष आमदारांना विस्तारात स्थान न दिल्याबाबत चर्चा केली. यावर सप्टेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा प्रहारला मंत्रिपद दिले जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे समजते. “फार महत्त्वाचे निर्णय केले पाहिजे त्यासाठी आम्ही आग्रही राहू. मंत्रीपदाचा विषय तो आमचा हक्का आणि तो आम्ही मिळवणारच. त्याबद्दल शंका नाही. ते आम्हाला मिळणारही आहे,” असे बच्चू कडू मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच्या बैठकीला जाताना म्हणाले होते.