Maharashtra Political Crisis: “शरद पवारांबद्दल अपशब्द काढला नाही, चुकीचे बोललो असेल तर जाहीर दिलगिरी व्यक्त करतो”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 01:53 PM2022-07-15T13:53:49+5:302022-07-15T13:55:03+5:30
Maharashtra Political Crisis: शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंडखोरी केली आणि भाजपसह नवे सरकार स्थापन केले. बंडखोरी का केली, यापुढची भूमिका काय, हे सर्वांना माहिती होण्यासाठी शिंदे गटाकडून दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडे प्रवक्तेपदाची धुरा देण्यात आली. यानंतर वेळोवेळी माध्यमांसमोर येऊन केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली. मात्र, अलीकडेच जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा सहभाग होता, असा दावा करत मोठी खळबळ उडवून दिली होती. यानंतर आता दीपक केसरकर यांनी शरद पवार यांची जाहीर माफी मागितली आहे.
आतापर्यंत शरद पवारांबद्दल एकही अपशब्द केलेला नाही. आतापर्यंत केवळ घडलेल्या घटनांचा उहापोह करण्यात आला होता. चुकीचे वाक्य कधीच नाही. मात्र, असे घडले असले तरी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. तसेच आवश्यकता भासल्यास शरद पवार यांच्या घरी जाऊनही भेट घेईल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
माझ्या जडणघडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा
बंडादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळेच ही वेळ आल्याचे सांगणारे दीपक केसरकर यांनी, शरद पवार एक ज्येष्ठ नेते आहेत. माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचेही केसरकर म्हणाले आहेत. तसेच नारायण राणेंच्या मुलाने ट्वीट केले की उद्धव ठाकरेंबद्दल एवढे प्रेम असेल तर मी मातोश्रीवर भांडी घासावी. हा माझा अपमान आहे. यानंतर मात्र सिंधुदुर्गातल्या एकाही शिवसैनिकाला निषेध करावासा वाटला नाही, असे केसरकर म्हणाले.
दरम्यान, राणेंची मुले कशी बोलतात याची काळजी घेण्याची जबाबदारी नारायण राणेंची आहे. नारायण राणेंशी माझा वाद नाही, त्याचे कार्यकर्ते जे वागतात त्यावर आक्षेप आहे. राणे त्यांच्या मुलांची काळजी घेण्यास समर्थ आहेत. मला सिंधुदुर्गाच्या हितासाठी जर राणेंसोबत काम करायचं असेल तर मी प्रत्यक्ष राणेंशी बोलेन, त्यांच्या मुलांशी का बोलेन. कारण तेवढा मी सिनिअर आहे. वयाने सिनिअर आहे, जवळ जवळ राणेंच्या वयाचा आहे. नारायण राणे यांच्याशी व्यक्तिगत माझा कुठलाही वाद नाही. त्या प्रकारे त्यांचे खालचे कार्यकर्ते वागतात, त्या कार्यपद्धतीवर माझा आक्षेप आहे. ज्याक्षणी कार्यपद्धती सुधारेल, माझा काहीच वाद राहणार नाही. नारायण राणे यांच्यातील मॅचुरीटी अनेक वर्ष काम केल्यामुळे आहे. ते खालून वर आलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यात कुणाशी बोलावे असे माझे मत नाही, असे केसरकरांनी म्हटलं आहे.