Deepak Kesarkar : "वाघ हा वाघच असतो, त्याने..."; दीपक केसरकरांचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 01:23 PM2022-09-19T13:23:21+5:302022-09-19T13:32:52+5:30
Deepak Kesarkar slams Shivsena Uddhav Thackeray : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
भारतातून १९५२ साली नामशेष झालेले चित्ते तब्बल ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून ८ चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्याच हस्ते या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात आलं. यानंतर यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपा आम्हाला पेंग्विन सरकार म्हणायची, आता त्यांना 'चिता सरकार' म्हणायचं का?" असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी (Shivsena Uddhav Thackeray) विचारला आहे. याला आता शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शिंदे गटातील आमदार आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. वाघाला चिता म्हटलं तर तो चिता होत नसतो. वाघ हा वाघच असतो असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. केसरकरांनी "वाघाला चिता म्हटलं तर तो चिता होत नसतो. वाघ हा वाघच असतो. वाघाने जेव्हा डरकाळी फोडली तेव्हा महाराष्ट्रात काय झाले, हे सर्वांनीच पाहिलेले आहे" असं म्हणत ठाकरेंना जशास तसं उत्तर दिलं आहे. तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे.
"भाजपा पेंग्विन सरकार म्हणायची, त्यांना 'चिता सरकार' म्हणायचं का?"
"दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जातं. ती भारतीय संस्कृती आहे. अनेकांना हा कमीपणा वाटतो. पण सत्तेच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांना ते कसे चालतात" असा सवालही दीपक केसरकर यांनी केला आहे. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी "राणीच्या बागेत आम्ही पेंग्विन आणले आणले म्हणून आम्हाला पेंग्विन सरकार म्हणत होता आता तुम्ही चित्ता आणलेत तर तुम्हाला चिता सरकार म्हणायचे का?" असा प्रश्न विचारला आहे.
"सरनाईक भाजपासोबत गेल्याने लॉन्ड्रीत टाकून चकाचक करण्याचा प्रयत्न"
"प्रताप सरनाईक यांच्या केसवरूनही हल्लाबोल केला आहे. प्रताप सरनाईकांची केस लोकशाही पेक्षाही मोठी आहे का? मग केस मागे घेण्याची घाई का?" असा सवालही विचारला. प्रताप सरनाईक शिंदे गटासोबत गेल्याने शिंदे सरकार त्यांची केस मागे घेण्याची घाई करत असल्याची टीकाही केली आहे. तसेच सरनाईक भाजपासोबत गेल्याने लॉन्ड्रीत टाकून, धूवून चकाचक करण्याचा हा प्रयत्न असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.