केसरकर शिंदेंच्याही पाठीत खंजीर खुपसून भाजपात जातील; राऊतांची जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 11:02 AM2023-10-10T11:02:27+5:302023-10-10T11:31:25+5:30
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळक्याने आधी आरशात पहावे. शिवसेना ही ठाकरेंची आहे हे कोणीही सांगेल.
दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन गटात संघर्ष सुरु झाला आहे. शिवाजीपार्कवर कोणाची सभा होणार, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून दोन्ही गटांनी अर्ज केले आहेत. त्यातच शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी आपला दसरा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ शिवाजीपार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होण्याची शक्यता आहे.
यावर देखील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळक्याने आधी आरशात पहावे. शिवसेना ही ठाकरेंची आहे हे कोणीही सांगेल. शिंदेना कोणी ओळखतही नाही, असे राऊत म्हणाले. तसेच केसरकर हे सावंतवाडीच्या मोती तलावातला डोमकावळा आहेत, ते केवळ पदासाठी सत्ते आले आहेत. हा माणूस सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसून निघून जाईल, यामुळे त्यांच्या शिवसेनेत येण्याला आमचा विरोध होता. आता हे शिंदेंच्याही पाठीत खंजीर खुपसून भाजपात निघून जातील, याची आम्हाला खात्री आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
शिंदेंसोबत जे गद्दार गेलेत ते ईडीच्या कथित केसेसच्या भीतीने गेले आहेत. ईडीच्या धाडी विरोधकांवरच का होतात? राहुल कुल, क्रिस्टल घोटाळा यांच्याकडे का टाकल्या जात नाहीत, असा सवालही राऊत यांनी केला आहे.
दीपक केसरकर म्हणाले कोलापूरच्या जबाबदारीतून मुक्त झालो...
माझ्या खांद्यावर कोल्हापूर व मुंबई शहर अशा दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. यातील कोल्हापूरच्या जबाबदारीतून मुक्त झालो आहे. त्यामुळे आता यापुढे मुंबई शहरमध्ये आठवड्यातून तीन दिवस देणार असून उर्वरित तीन दिवस सावंतवाडी मतदारसंघाला देणार असल्याचे केसरकर यांनी काल सांगितले होते.