...म्हणून एकनाथ शिंदे म्हणाले, मी करेक्ट कार्यक्रम करतो; दीपक केसरकरांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 07:51 AM2024-02-27T07:51:35+5:302024-02-27T07:52:37+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवन परिसरात भेट झाली. त्यावेळी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
मुंबई - Deepak Kesarkar on Eknath Shinde Video ( Marathi News ) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पटोलेंशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी लिमीटच्या बाहेर गेलं की आपण कार्यक्रम करतो असं विधान केलेले आहे. या विधानावरून मुख्यमंत्री जरांगेबाबत असं बोलले असा दावा विरोधक करतायेत. त्यावर आता मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबईत पत्रकारांनी दीपक केसरकर यांना याबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, नाना पटोलेंना विचारायचं होतं, संजय राऊतांचं काय चाललंय. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, योग्यवेळ आल्यावर आम्ही कार्यक्रम करू. कारण तो कार्यक्रम कधीतरी होणं आवश्यक आहे. किती वाईट बोलावं याला काही मर्यादा असतात आणि तो कार्यक्रम चोख उत्तर देऊन होऊ शकतो असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत कुणीतरी जरांगेंचा गैरसमज करून देतंय. शेवटी यामागची व्यक्ती शोधून काढली पाहिजे. कारण मराठा समाजाला न्याय मिळतोय, आरक्षण १० टक्के मिळालेच परंतु त्याचसोबत कुणबी दाखलेही मिळतायेत. एक आनंदाचं वातावरण महाराष्ट्रात असताना त्यात कुणीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न काही शक्ती करतायेत. या शक्ती ओळखल्या पाहिजेत. जे लोकांसाठी काही करू शकले नाहीत ते पाठीमागून अशा कुरघोड्या करत असतात. जरांगे पाटील यांनी याला बळी पडू नये. जरांगेंनी जे कष्ट घेतले त्याची जाणीव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे ते सातत्याने त्यांच्यासोबत राहिले. महाराष्ट्राच्या इतिहासात एखादा मुख्यमंत्री आंदोलकाला भेटायला गेला त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु जर कुणी त्यांना खोट्या गोष्टी सांगितल्या तर त्याला जरांगेंनी बळी पडू नये असं आवाहन केसरकरांनी जरांगे पाटील यांना केले आहे.
काय घडलं होतं?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवन परिसरात भेट झाली. दोघेही एकमेकांसमोर आल्यावर त्यांच्यात खेळीमेळीत संभाषण झाले. यातील एका संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'सामाजिक कार्यकर्ता होता, तोपर्यंत सर्व ठीक होते. लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतो मी,' हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान सध्या चर्चेत आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा रोख मनोज जरांगे-पाटील यांच्या दिशेने का? अशी चर्चाही रंगत आहे.