सिंधुदुर्गात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय उभारणार- दीपक सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:45 AM2018-07-01T00:45:27+5:302018-07-01T00:45:37+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला अद्ययावत आरोग्य सेवा-सुविधा मिळण्यासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असून, त्याची मान्यता पुढच्या वर्षी येईल, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी केली.
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला अद्ययावत आरोग्य सेवा-सुविधा मिळण्यासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असून, त्याची मान्यता पुढच्या वर्षी येईल, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी केली. एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याबाबत पावसाळी अधिवेशनानंतर निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
वालावल (ता.कुडाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सावंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा-सुविधांचा मोठा प्रश्न असून डॉक्टरांची संख्याही कमी आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालय व्हावे, याकरिता आम्ही प्रयत्नशील असून, येत्या वर्षभरात त्याची मान्यता येईल.
अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे शासनाचे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल जिल्ह्यात होण्यासाठी वीस कोटींचा निधी वर्ग केला आहे. कुडाळमध्ये महिला रुग्णालय लवकरच सुरू होईल.
स्वाभिमानचे उद्घाटन
वालावल येथील आरोग्य केंद्र्राचे उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मिळताच, वालावल पंचक्रोशीतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाºयांनी शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते उद्घाटन केले.