"ब्ल्यू प्रिंटला ९ वर्ष लागली मग रस्ता बनवायला जादूची छडी नाही, लगेच व्हायला"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 07:50 PM2023-08-21T19:50:26+5:302023-08-21T19:50:59+5:30
तुम्ही रस्त्यावर उतरणार, तोडफोड करणार, कंत्राटदाराच्या कंपनीचे कार्यालय फोडले. गरीबांच्या पोराला पुढे करून स्वत: फाईव्ह स्टारमध्ये बसतात असा आरोप सय्यद यांनी मनसेवर केला.
मुंबई – गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे जागरयात्रा काढणार आहे. त्याआधीच शिंदे गटाच्या दीपाली सय्यद यांनी मनसेवर बोचरी टीका केली आहे. मनसेची ब्ल्यू प्रिंट कागदावर यायला ९ वर्ष लागली मग रस्ता बनवायला जादूची छडी नाही लगेच व्हायला. रस्ता बनवायला वेळ लागणार आहे. इतक्या वर्षाचा बॅकलॉग आहे तो पूर्ण करायला सरकारला वेळ तरी द्या अशा शब्दात दीपाली सय्यद यांनी मनसेवर घणाघात केला आहे.
दीपाली सय्यद म्हणाल्या की, तुम्ही रस्त्यावर उतरणार, तोडफोड करणार, कंत्राटदाराच्या कंपनीचे कार्यालय फोडले. गरीबांच्या पोराला पुढे करून स्वत: फाईव्ह स्टारमध्ये बसतात. सरकार काम करतंय, वेळ द्या. तुम्हाला जागर यात्रा काढायची तर काढा. पण सरकार जे काम करतेय त्याची प्रशंसा करा. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करतंय. मग तुम्ही तोडफोड कशाला करताय? असा सवाल त्यांनी मनसेला विचारला.
तसेच राजकारणात टीका होत असते, प्रत्येकाला वाटते रस्ता व्हायला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत, गणपतीपूर्वी एक लेन सुरू होईल. त्यानंतर मनसेने हे आंदोलन सुरू केले. श्रेयवादासाठी हे सुरू आहे. कुठलेही काम सुरू करायचे आणि अर्धवट ठेवायचे हे मनसेचे नवीन नाही असंही सय्यद यांनी म्हटलं. त्याचसोबत संदीप देशपांडे घराबाहेर पडता, स्टंटबाजी करता, तुम्हाला कुठे तरी लागते व्हिलचेअर बसता ही स्टंटबाजी आहे. खूप खालच्या पातळीवर टीका सुरू आहे. इतक्या गलिच्छ भाषेत शब्द वापरले जातात. विचारपूर्वक बोलायला हवा. राज ठाकरेंनी इतके शिकवले असेल. मी सगळे जमा केले आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करणार आहे. चुकीला माफी नाही. बोलताना विचार करत नाही. या गोष्टीची दखल घेतली जाईल असं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद म्हणाल्या.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या जीवावर राऊत खासदार झाले आहेत. त्यामुळे आता संजय राऊतांना माहिती आहे यापुढे खासदार होऊ शकत नाही. त्यामुळे ईशान्य मुंबईचा रस्ता त्यांनी निवडला आहे. जेव्हापासून एकनाथ शिंदे खुर्चीवर बसलेत तेव्हापासून त्यांच्यामागे विघ्न लावले जात आहे असं म्हणत दीपाली सय्यद यांनी संजय राऊतांनाही टोला लगावला.