राजभवनात रंगला ‘दीपोत्सव’ सोहळा

By Admin | Published: September 17, 2015 03:58 AM2015-09-17T03:58:13+5:302015-09-17T03:58:13+5:30

‘जिथे मराठी, तिथे लोकमत’ हे ब्रीदवाक्य जपत खपाच्या ऐतिहासिक विक्रमाने मराठीच्या अभिमानाचा झेंडा रोवणाऱ्या ‘दीपोत्सव’ला मिळालेल्या विक्रमी खपाच्या प्रमाणपत्राचा ठेवा बुधवारी राज्यपालांकडे

'Deepotsav' ceremony at Rang Bhavana | राजभवनात रंगला ‘दीपोत्सव’ सोहळा

राजभवनात रंगला ‘दीपोत्सव’ सोहळा

googlenewsNext

- जिथे मराठी, तिथे लोकमत : विक्रमी खपाच्या प्रमाणपत्राचा ठेवा राज्यपालांकडे समारंभपूर्वक सुपुर्द

मुंबई : ‘जिथे मराठी, तिथे लोकमत’ हे ब्रीदवाक्य जपत खपाच्या ऐतिहासिक विक्रमाने मराठीच्या अभिमानाचा झेंडा रोवणाऱ्या ‘दीपोत्सव’ला मिळालेल्या विक्रमी खपाच्या प्रमाणपत्राचा ठेवा बुधवारी राज्यपालांकडे समारंभपूर्वक सुपुर्द करण्यात आला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मांदियाळीच्या साक्षीने साजऱ्या झालेल्या या समारंभाने अमृताते पैजा जिंकणाऱ्या मराठीची मान अपूर्व अभिमानाने उंचावली.
‘लोकमत’च्या दीपोत्सव-२०१४ने तब्बल एक लाख प्रतींच्या विक्रीचा टप्पा ओलांडला. उभ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशा या ऐतिहासिक घटनेचे प्रतिबिंब एबीसी प्रमाणपत्रात उमटले. दीपोत्सवच्या १,०१,१६७ प्रतींच्या विक्रमी खपाचे हे प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेसाठी भाग्याचा ठेवाच ठरला आहे. मराठीचा मान आणि शान यात मोलाची अभूतपूर्व भर टाकणारा हा ठेवा राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपुर्द केला आणि त्या क्षणी उपस्थितांनी केलेल्या टाळ््यांच्या कडकडाटाचा आवाज राजभवनच्या पायथ्याशी येऊन थबकणाऱ्या समुद्राच्या लाटांच्या आवाजाशी स्पर्धा करून गेला. ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’, या ज्ञानेश्वरीतील ओवीचा मायमराठीत उच्चार करून राज्यपालांनी दीपोत्सवच्या निमित्ताने झालेल्या मराठी भाषेच्या गौरवावर कळसाध्याय रचला.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल, लेखिका शोभा डे, झी ग्रुपचे सुभाषचंद्र, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील, पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे, उद्योगविश्वातील गौतम सिंघानिया, सज्जन जिंदाल, वेणुगोपाल धूत यांच्यासह कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, व्यापार, पत्रकारिता वेगवेगळ््या क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीने या सोहळ्याची उंची वाढली.
दिवाळी अंक हे मराठी संस्कृतीचे अभिजात वैशिष्ट्य व त्याला तितकीच उज्ज्वल शतकी परंपराही आहे. असे असले तरी आजवर एकाही दिवाळी अंकाला एक लाखाच्या खपाचा पल्ला गाठता आला नव्हता. मात्र दिवाळी अंकांची पारंपरिक चौकट मोडून मजकुरापासून मांडणीपर्यंत आणि छपाईपासून वितरणापर्यंत नवी वाट चोखाळत अत्यंत दर्जेदार सादरीकरण करून दीपोत्सवने हा टप्पा लीलया पार केला. एबीसीने त्यावर शिक्कामोर्तब करताच मराठी भाषेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. हा सन्मान केवळ लोकमतचा नसून तो तमाम मराठी भाषिकांचा असल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एबीसीचे हे प्रमाणपत्र राज्यपालांना सुपुर्द करण्यात येत आहे, असे लोकमतचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी सांगितले. लोकमतच्या फीचर एडिटर अपर्णा वेलणकर यांनी दिवाळी अंकांच्या पारंपरिक रूढीवादाला दीपोत्सवच्या रूपाने ‘लोकमत’ने
कसा नकार दिला आणि मर्यादांचे रिंगण कसे ओलांडले याचे विवेचन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात ‘लोकमत’ने केलेले प्रयोग व सर्व प्रकारच्या वाचकांशी जोडलेले नाते याचा आवर्जून उल्लेख केला. दीपोत्सवच्या माध्यमातून लोकमतला वाचकांची पसंती मिळाली आहे. या प्रमाणपत्रामुळे त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाल्याचे सांगताच सभागृहातील शेकडो हातांनी टाळ््यांचा गजर केला. त्यानंतर तो सुवर्ण क्षण आला, ज्याची सारेच जण आतूरतेने वाट पाहात होते. दर्डा कुटुंबातील चौथ्या पिढीचे
प्रतिनिधी आर्यमन देवेंद्र दर्डा यांनी एबीसीचे प्रमाणपत्र ‘लोकमत’ परिवारातील उच्चपदस्थांसह व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केले आणि मुख्यमंत्र्यांनी ते राज्यपाल राव यांच्याकडे मराठी माणसाच्या अभिमानाचा ऐतिहासिक ठेवा सोपवला.
राज्यपाल राव यांनी ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. एैसे अक्षरे रसिके मेळविन,’ या ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतवाणीने भाषणाचा प्रारंभ करून उपस्थितांना सुखद धक्का दिला. मी सर्वांचे राजभवनवर स्वागत करतो. मला मराठी चांगले बोलता येत नाही हे आपण पाहातच आहात; पण मी मराठी शिकत आहे. पुढच्या वेळी पूर्ण भाषण मराठीत करीन, असा शब्दही त्यांनी उपस्थितांना दिला. मराठीतील दिवाळी अंकांच्या परंपरेचा आढावा घेत राज्यपालांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगात असताना लिहिलेली व ‘आंध्र ज्योती’ या अंकात ३५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली कथा दीपोत्सवच्या पुढील अंकात प्रसिद्ध करावी, असे आवाहन केले. त्यावेळी उपस्थितांनी दाद दिली.
‘लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले, दरबार हॉलमधील याच मंचावर मी एकंदर चारवेळा हजर राहिलो आहे. तीनवेळेला मंत्रीपदाची शपथ घेण्याकरिता हजर होतो; पण आज ‘लोकमत’चा मुख्य संपादक म्हणून या मंचावरून बोलणे हे माझ्यासाठी अधिक अभिमानाची बाब आहे. मराठवाड्यातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करून नैसर्गिक आपत्तीकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, संचालक करण दर्डा, समूह संपादक दिनकर रायकर, प्रेसिडेन्ट (मार्केटिंग) करुण गेरा, व्हाईस प्रेसिडेन्ड (वितरण) वसंत आवारी आदींनी उपस्थितांचे स्वागत केले, तर वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी संचालन केले. (विशेष प्रतिनिधी)


‘प्रवासी मराठी दिवस’ साजरा व्हावा राज्यपालांची सूचना ..
आज महाराष्ट्रातील लोकांनी जगाच्या विविध देशांत यशाची शिखरे सर केली आहेत. राज्याच्या विकास प्रक्रियेत योगदान देण्यास हा समुदाय उत्सुक आहे. त्यामुळे जगभर विखुरलेल्या मराठी जनांची एक सूची (डेटाबेस) तयार करायला हवी. या सर्वांना राज्याच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रवासी भारतीय दिनाच्या धर्तीवर जगभरातील मराठी लोकांना जोडणारा प्रवासी मराठी दिवस साजरा व्हायला हवा, असे आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी याप्रसंगी केले.

Web Title: 'Deepotsav' ceremony at Rang Bhavana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.