धाराशिवमध्ये दीर-भावजय आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 09:50 AM2024-04-05T09:50:44+5:302024-04-05T09:52:32+5:30
उस्मानाबाद लोकसभेतील महायुतीच्या जागेचा अन् उमेदवारीचाही गुंता अखेर सुटला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा ऐनवेळी अजित पवार गटात प्रवेश घडवून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
धाराशिव/मुंबई - उस्मानाबाद लोकसभेतील महायुतीच्या जागेचा अन् उमेदवारीचाही गुंता अखेर सुटला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा ऐनवेळी अजित पवार गटात प्रवेश घडवून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे लोकसभेतील भाऊबंदकीचा दुसरा अध्याय या लढतीच्या निमित्ताने लिहिला जाणार आहे.
महाविकास आघाडीतून उद्धवसेनेचे विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीत मात्र जागा कोणी लढवायची, यावरून बरेच दिवस खल सुरू होता. मागच्या शनिवारीच ही जागा अजित पवार गटाला सोडण्याचा निर्णय झाला होता. यानंतर तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश करवून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अर्चना पाटील या मागील टर्ममध्ये जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राहिलेल्या आहेत.
गतवेळी झाली होती भाऊ विरुद्ध भाऊ लढत
- दोन वेळा विधानसभा निवडणुकीत आमनेसामने झाल्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही ओम राजेनिंबाळकर विरुद्ध राणाजगजितसिंह पाटील यांच्यात लढत झाली होती.
- हे दोघेही नात्याने चुलत बंधू आहेत. आता यावेळी पाटील यांच्या पत्नी रिंगणात असल्याने भाऊबंदकी यावेळी कायम राहिली असून, दीर-भावजयीत सामना रंगणार आहे.