बदनामी दावा कोल्हापूरहून मुंबईत

By admin | Published: February 17, 2016 03:20 AM2016-02-17T03:20:43+5:302016-02-17T03:20:43+5:30

राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते गणपत दि. कुलथे यांच्यावर राज्याचे माजी मंत्री व कागलचे राष्ट्रवादीचे आमदार हसनसाहेब मियालाल मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयात दाखल केलेला

Defamation claim from Kolhapur to Mumbai | बदनामी दावा कोल्हापूरहून मुंबईत

बदनामी दावा कोल्हापूरहून मुंबईत

Next

मुंबई : राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते गणपत दि. कुलथे यांच्यावर राज्याचे माजी मंत्री व कागलचे राष्ट्रवादीचे आमदार हसनसाहेब मियालाल मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयात दाखल केलेला बदनामीचा दावा सुनावणीसाठी मुंबईत आपल्याकडे वर्ग करून घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
कुलथे यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप करून त्याबद्दल त्यांच्याकडून एक कोटी पाच हजार रुपये भरपाई मिळविण्यासाठी मुश्रीफ यांनी केलेला हा दिवाणी दावा कोल्हापूर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात गेली पाच वर्षे प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाने आता हा दावा स्वत:कडे वर्ग करून घेऊन त्याची यापुढील सुनावणी येथे मुंबईतच घेण्याचा आदेश दिल्याने वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या व तीव्र मधुमेहाचा त्रास असलेल्या कुलथे यांचे सुनावणीच्या प्रत्येक तारखेला मुंबईहून कोल्हापूरपर्यंत हेलपाटे वाचणार आहेत.
कुलथे यांनी केलेला अर्ज मंजूर करून न्या. रमेश डी. धानुका यांनी हा आदेश दिला. कोल्हापूर न्यायालयात या दाव्याच्या आत्तापर्यंत ३३ तारखा झाल्या. त्या प्रत्येक वेळी कुलथे मुंबईहून तेथे जाऊन हजर राहिले. मुश्रीफ हे मात्र फक्त तीन तारखांना हजर राहिले. याबद्दल न्यायालयाने त्यांना खर्च देण्याचेही आदेश दिले होते, याची न्या. धानुका यांनी नोंद घेतली.
वयोवृद्ध व आजारी असलेले कुलथे मुंबईत वांद्रे येथे राहतात. इतकी वर्षे ते दाव्याच्या प्रत्येक तारखेला कोल्हापूरला जात आले. पण आता त्यांना प्रत्येक वेळी कोल्हापूरला जाणे त्रासाचे आहे. मुश्रीफ मुळचे कागल, कोल्हापूरचे असले तरी आमदार असल्याने त्यांचे मुंबईतही घर आहे व एरवीही त्यांचे वरचेवर मुंबईला येणे होत असते. त्यामुळे हा दावा मुंबईत चालविण्याने त्यांची काहीच गैरसोय होणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Defamation claim from Kolhapur to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.