अपघातात विमा कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक
By Admin | Published: January 11, 2016 02:39 AM2016-01-11T02:39:53+5:302016-01-11T02:39:53+5:30
राज्यात अपघाताच्या शेकडो घटना दररोज कुठे ना कुठे घडतात. हे अपघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले असले, तरी त्यातील अनेक प्रकरणात चालक मात्र तेच ते आढळून आले आहे.
राजेश निस्ताने, यवतमाळ
राज्यात अपघाताच्या शेकडो घटना दररोज कुठे ना कुठे घडतात. हे अपघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले असले, तरी त्यातील अनेक प्रकरणात चालक मात्र तेच ते आढळून आले आहे. थोड्याशा पैशासाठी हे चालक अपघाताचा गुन्हाच स्वत:च्या अंगावर घेतात. या मृत्यूूदाव्यांच्या माध्यमातून विमा कंपन्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली जात आहे. अपघात विम्याचा लाभ मिळविण्यासाठी आता हा नवा फंडा जोरात सुरू आहे.
अपघात विमा लाटण्याच्या या प्रकारात पोलीस, गाडी मालक, चालक, कायद्याचे अभ्यासक, डॉक्टर, विमा कंपन्यांचे इन्व्हेस्टिगेटर व अधिकारी असे सर्वच घटक सहभागी आहेत. अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसांना वैैयक्तिक विमा (त्याने काढलेला असेल तर) लाभ मिळू शकतो.
मात्र, त्याला अपघात विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी मोठी सर्कस केली जाते. विमा असलेल्या जड वाहनाचा चालक अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी तयार केला जातो. त्याला २५ ते ५० हजार रुपये दिले जातात. या गुन्ह्यात सुरुवातीला वाहन अज्ञात असते.
नंतर कुणी तरी प्रत्यक्ष साक्षीदार उभा करून आपल्या सोयीच्या वाहनाचा व चालकाचा सहभाग दाखविला जातो. ‘नियोजित’ चालक न्यायालयात गुन्हा कबूल करतो, न्यायालय त्याला केवळ दंड ठोठावते. त्याच्या या कबुलीने अपघात विमा प्राधिकरण मृताच्या वारसांना विमा लाभ मंजूर करते.
विशेष असे, अनेक अपघात हे मध्यरात्रीनंतर आणि निर्जन स्थळी झालेले असतात, तरीही कुणीतरी हा अपघात पाहणारा उभा केला जातो. सर्व मिलीभगत असल्याने कुणीच काही खोलात जाण्याची तसदी घेत नाही.