नकारात्मक प्रचारामुळे पराभव
By Admin | Published: October 26, 2014 12:16 AM2014-10-26T00:16:55+5:302014-10-26T00:16:55+5:30
राज्यातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या हिताचे निर्णय घेतले. पण लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेले नकारात्मक प्रचाराचे अभियान
माणिकराव ठाकरे यांचा दावा : बंडखोरांना ‘नो एन्ट्री’
नागपूर : राज्यातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या हिताचे निर्णय घेतले. पण लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेले नकारात्मक प्रचाराचे अभियान विधानसभेतही भाजपकडून राबविण्यात आले. या फसव्या प्रचाराने मतदारांना भुरळ घातली व त्यातून पराभव झाला, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला.
माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत पराभवाची कारणमीमांसा केली. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला पण अद्याप त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही, असे सांगत आपण अजूनही प्रदेशाध्यक्षपदी कायम असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचविले. स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना होती. पण पक्ष म्हणून समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याची भूमिका होती. राष्ट्रवादीने त्याला योग्य प्रतिसाद दिला नाही, असे सांगत आघाडी तुटण्याचे खापर त्यांनी राष्ट्रवादीवर फोडले. काँग्रेसकडे बरेच सक्षम चेहरे आहेत.
यापैकी एकाची लवकरच विधिमंडळ नेतेपदी निवड केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. भाजपला समर्थन देण्यात राष्ट्रवादीने उतावीळपणा दाखविल्यामुळे जनतेला राष्ट्रवादीबाबत शंका येऊ लागली आहे. काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध असून कुणीही भाजप-सेनेला समर्थन देणार नाही, असा दावा त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपने जनतेला वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन दिले होते. आता ते आश्वासन पाळतात का ते पाहू, असा टोलाही त्यांनी लगावला. या वेळी माजी मंत्री नितीन राऊत, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, तानाजी वनवे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इव्हीएममध्ये गडबडीच्या तक्रारी
काँग्रेसच्या उमेदवारांनीही इव्हीएममध्ये गडबड असल्याच्या तक्रारी प्रदेश काँग्रेसकडे केल्या आहेत. बऱ्याच उमेदवारांना अनेक बूथवर अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली आहेत. इतर पक्षांच्या उमेदवारांच्याही अशाच तक्रारी आहेत. ज्या बूथवर ९० टक्के मते मिळतील अशी अपेक्षा होती तेथे ३ ते ४ मते मिळाली आहेत. असे कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे. राज्यभरात या विषयाची वेगाने चर्चा सुरू आहे. संबंधित उमेदवार व्यक्तिश: निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रारी करणार आहेत, असे सांगत प्रदेश काँग्रेसने अशी तक्रार करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असेही माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
८ ला दिल्लीत बैठक
पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी २८ आॅक्टोबर रोजी दिल्ली येथे बैठक बोलविली आहे. तीत पराभव झालेल्या सर्व राज्यातील प्रदेश अध्यक्षांसह प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका, नेमणुका आदी विषयांवर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.