निवडणूक हरलो; विमान तिकिटाचे पैसे विसरा!

By Admin | Published: June 28, 2016 09:39 PM2016-06-28T21:39:12+5:302016-06-28T21:39:12+5:30

नाशिक जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांना कोलकात्याची हवाई सफर घडविली. नंतर मात्र निवडणूक हरल्याचे कारण दाखवून विमान तिकिटाचे १० लाख २३ हजार ५६८ रुपये देण्यास नकार दिला.

Defeat the election; Forget the airline ticket! | निवडणूक हरलो; विमान तिकिटाचे पैसे विसरा!

निवडणूक हरलो; विमान तिकिटाचे पैसे विसरा!

googlenewsNext

टूर्स चालकाला सव्वादहा लाखांचा गंडा : अद्वैय हिरे, प्रशांत हिरे यांचे स्वीय सहायक प्रतीक काळे यांच्याविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद : नाशिक जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांना कोलकात्याची हवाई सफर घडविली. नंतर मात्र निवडणूक हरल्याचे कारण दाखवून विमान तिकिटाचे १० लाख २३ हजार ५६८ रुपये देण्यास नकार दिला. औरंगाबादच्या टूर्सचालकाची अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या नाशिक येथील अद्वैय हिरे आणि प्रतीक काळे यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
दानिश टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे हिदायतुल्ला खान यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. नाशिकच्या राजकारणातील बडे प्रस्थ प्रशांत हिरे यांचे स्वीय सहायक असणाऱ्या प्रतीक काळे यांचा हिदायतुल्ला खान यांना ३१ मे २०१५ रोजी फोन आला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अद्वैय हिरे हे उमेदवार आहेत. निवडणुकीत विजयी होण्यासाठी १८ संचालकांना कोलकाता येथे विमानाने सहलीसाठी न्यायचे आहे. मुंबई ते कोलकाता या विमान प्रवासाची १८ जणांच्या तिकिटाची तातडीने बुकिंग करा, असे प्रतीक काळे यांनी सांगितले. तिकिटांची बुकिंग करतो, पैसे माझ्या बँक खात्यात जमा करा,असे हिदायतुल्ला म्हणाले असता, अद्वैय हिरे हे बँकेचे अध्यक्ष निश्चितपणे बनणार आहेत. निवडणूक झाल्यानंतर तीन दिवसांत तुम्हाला पैसे दिले जातील. तसेच हिरे यांच्या कारखान्याची निवडणूकदेखील लवकरच होणार असून, त्यानिमित्त बऱ्याच जणांना विमानाने प्रवास करावा लागेल. त्या विमान प्रवासाची बुकिंग तुमच्यामार्फतच केली जाईल. असे काळे यांनी सांगितले.
काळे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून हिदायतुल्ला यांनी २, ९१, २६८ रुपये खर्चून १८ जणांच्या मुंबई ते कोलकाता या विमान सहलीचे बुकिंग केले. तिकीट कन्फर्म झाल्याचे त्यांनी अद्वैय हिरे आणि प्रतीक काळे यांना कळविले. त्यानंतर हिरे यांच्यासह १८ जणांनी मुंबई ते कोलकाता, असा विमान प्रवास केला.

परतीचीही तिकीटे काढा!
हिदायतुल्ला खान यांना २ जून २०१५ रोजी पुन्हा प्रतीक काळे यांचा फोन आला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तात्काळ नाशिकला जाणे गरजेचे असल्याने कोलकाता ते मुंबई, अशी परतीच्या प्रवासाची १८ विमान तिकीटे काढण्याची मागणी काळे यांनी केली. ऐनवेळी तिकीट मिळणे शक्य होणार नाही, असे हिदायतुल्ला यांनी सांगितल्यानंतर, कोणत्याही क्लासची तिकीटे काढा, परंतु आजच बुकिंग करा, अशी विनंती काळे यांनी केली. त्यानंतर हिदायतुल्ला यांनी जेट एअरवेजच्या फ्लाईटमध्ये बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासची १८ तिकीटे बूक केली. प्रतीक हिरे यांच्यासह १८ जणांनी कोलकाता ते मुंबई,असा प्रवास करुन नाशिक गाठले.

म्हणे, वैयक्तिक वसुली करा
नाशिक जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर हिदायतुल्ला यांनी हिरे आणि काळे यांच्याशी संपर्क साधला. मुंबई ते कोलकाता आणि कोलकाता ते मुंबई, या विमानप्रवासाच्या १८ जणांच्या तिकिटाचे ८ लाख ३५ हजार ५६८ रुपये, सर्व्हिस चार्ज ४,२५४ रुपये आणि विमान कंपनीचे व्याज १ लाख ८३ हजार ९८६, असे १० लाख २३ हजार ५६८ रुपये देण्याची मागणी त्यांनी केली.  बँकेची निवडणूक आम्ही हारलो असून, ज्यांच्या नावाने विमानाची तिकीटे बूक केली होती, त्यांच्याकडूनच तिकीटाचे पैसे वसूल करा, असे उत्तर आरोपींनी दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हिदायतुल्ला यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपासासाठी तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. फौजदार सुभाष खंडागळे तपास करीत आहेत.

यांनी केला विमान प्रवास
अद्वैय हिरे, सुहास कंदे, अनिल कदम, धनंजय पवार, गणपतराव पाटील, शिरीष कोतवाल, संदीप गुळवे, परवेज कोकणी, नामदेव हलकेदार, केदा आहेर, दिनेश बच्छाव, सचिन सावंत, अशोक आखाडे, शेख रियाज, निवृत्ती बोडखे, संतोष डोमे, बापू जाधव, राजेंद्र डोकाळे.

Web Title: Defeat the election; Forget the airline ticket!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.